मुंबई - पाठिवरचे दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतून महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांना टॅब देण्यात आले होते. मात्र, त्यापैकी बहुतांशी टॅब बंद पडले आहेत. दहावीची परीक्षा जवळ आली असताना टॅबचा उपयोगच होत नसल्याची धक्कादायक माहिती शिक्षण समिती समोर आली. येत्या ९ जानेवारीला होणाऱ्या विशेष सभेत याबाबत माहिती देण्याचे आदेश शिक्षण समिती अध्यक्ष अंजली नाईक यांनी प्रशासनाला दिले आहेत.
टॅब योजना शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची ड्रीम संकल्पना होती. 2014 पासून विद्यार्थ्यांना टॅब देण्याची योजना सुरू करण्यात आली. मात्र, या योजनेचा बोजवारा उडाला आहे. आतापर्यंत सुमारे ४० हजार टॅब इयत्ता ८ वी ते १०वीच्या विद्यार्थ्यांना देण्यात आले आहेत. यातील बहुतांशी टॅब बंद असल्याने पडून आहेत. काही टॅबमध्ये एसडी कार्ड नसल्याने त्याचा उपयोग होत नाही. इयत्ता १० वीची परीक्षा जवळ आली असल्याने अभ्यास करताना विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे. शैक्षणिक वर्ष संपत आले असताना या टॅबच्या दुरुस्तीसाठी नवे कंत्राट दिले जाणार आहेत, असा खुलासा करत राष्ट्रवादीच्या नगरसेविका सईदा खान यांनी शिक्षण समितीत हरकतीचा मुद्दा मांडून ही वस्तूस्थिती समोर आणली.