मुंबई: राज्य सरकारने कुलगुरू निवडीचे अधिकार हातात घेण्याचे विधिमंडळात संमत केलेल्या विधेयकाला राज्यपाल भगत सिंह कोश्यारी ( Governor Bhagat Singh Koshyari ) यांनी केराची टोपली दाखवली आहे. त्याचबरोबर राज्यपालांनी कुलगुरु निवडीची प्रक्रिया सुरू ( VC selection process begins ) केली आहे. त्यामुळे राज्यपाल विरुद्ध सरकार विशेष करून शिवसेना, असा संघर्ष पुन्हा पेटण्याची शक्यता आहे.
आघाडी सरकार सत्तेवर आल्यापासून राज्यपाल आणि राज्य सरकारमध्ये विविध मुद्यांवरुन जुंपली आहे. विविध मुद्द्यांवरून राज्यपालांनी महाविकास आघाडी सरकारची कोंडी केली आहे. राज्य विधिमंडळात सार्वजनिक विद्यापीठ कायदा 2016 ( Public University Act 2016 ) मध्ये सुधारणा करणारे विधेयक मंजूर करण्यात आले. या विधेयकात कुलगुरू निवडीचे अधिकार कुलगुरूकडे ठेवले आहेत. तसेच राज्य सरकारने स्थापन केलेली समिती पाच नावांची शिफारस करून दोन नाव राज्यपालांकडे मंजुरी करिता पाठवेल. त्यापैकी एका नावाला राज्यपाल यांनी मंजुरी द्यावी, अशा स्वरूपाचे हे विधेयक होते.