मुंबई- मराठा आरक्षणआंदोलनातील ( Maratha Reservation Agitation ) मृतांच्या वारसांना प्रत्येकी 10 लाख रूपये देण्याच्या आश्वासनाची महाविकास आघाडीने पूर्तता केली आहे. मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून एकूण 34 कुटुंबीयांसाठी मदतीची रक्कम संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना वर्ग करण्यात आली आहे.
युती सरकारचे आश्वासन पूर्तता ठाकरे सरकारची...
मराठा आरक्षण आंदोलनात मृत्युमुखी पडलेल्यांच्या वारसांना प्रत्येकी 10 लाख रूपये देण्याची घोषणा मागील सरकारच्या काळात करण्यात आली होती. पण, प्रत्यक्षात केवळ 15 कुटुंबीयांना प्रत्येकी 5 लाख रूपये देण्यात आले होते. मागील सरकारचे हे आश्वासन महाविकास आघाडी सरकार पूर्ण करेल व या कुटुंबीयांना राज्य शासनाकडून प्रत्येकी 10 लाख रूपये देण्यात येतील, असा शब्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( Chief Minister Uddhav Thackeray) आणि मराठा आरक्षण विषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी मराठा समन्वयकांना दिला होता. त्यानुसार मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून 2 कोटी 65 लाख रूपयांचा निधी संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना वर्ग करण्यात आला आहे. आजवर शासनाची मदत न मिळालेल्या 19 वारसांना प्रत्येकी 10 लाख तर यापूर्वी 5 लाख रूपये मिळालेल्या 15 वारसांना प्रत्येकी आणखी 5 लाख रूपये या निधीतून दिले जातील.