मुंबई -कोरोनामुळे एसटी महामंडळाला मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका बसला आहे. त्यामुळे प्रवासी महसुलात लक्षणीय घट आली आहे. एसटीच्या तोटा कमी करण्यासाठी आणि एसटीचे उत्पन वाढविण्यासाठी आता एसटी चालक व वाहकांना वाहतूक नियोजनात त्यांच्या सहभाग करण्याचे आदेश एसटी महामंडळाने राज्यातील सर्व विभाग नियंत्रकांना दिले आहेत. त्यामुळे आता तोट्यातील महामंडळाचे स्टेअरिंग एसटी चालक व वाहक यांच्या हाती येणार आहे.
राज्यातील सर्व विभाग नियंत्रकांना आदेश
महाराष्ट्रात सार्वजनिक वाहतूकीत महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ अर्थात एसटीचे महत्त्वपूर्ण स्थान आहे. ग्रामीण भागाची जीवन वाहिनी, असेही एसटीला संबोधले जाते. मात्र, सध्या एसटीमध्ये उत्पन्नपेक्षा सेवेसाठी खर्च जास्त होत आहे. तसेच दिवसेंदिवस एसटी महामंडळाचा तोटा वाढत असल्यामुळे एसटी महामंडळाची डोकेदुखी वाढली आहे. एसटीचा तोटा कमी करण्यासाठी आणि एसटीचे उत्पन वाढविण्यासाठी एसटी महामंडळाकडून प्रवासी वाहतूक नियोजनाचा बैठकीत चालक-वाहकाचा समावेश करण्याचे नियोजन महामंडळाने केले आहे. एसटी महामंडळामध्ये चालक-वाहक हे प्रमुख घटक असून सर्व फेऱ्यांची प्रत्यक्ष अंमलबजावणी त्यांच्यामार्फत केली जाते. त्यामुळे त्यांना या फेऱ्यांवर व मार्गावरील सर्व बाबींची सखोल माहिती असते. पण, एसटी बसेसचे वेळापत्रक तयार करताना त्यांच्या या माहितीचा योग्य विचार करुन वापर केला जात नाही. चालक-वाहकांकडून त्यांच्या उपलब्ध असलेली माहिती घेऊन महामंडळाला प्रवासीभिमुख सेवा व उत्पन्न वाढविण्यासाठी प्रवासी वाहतूक नियोजनात त्यांच्या सहभाग करून देण्याचे आदेश एसटी महामंडळाने राज्यातील सर्व विभाग नियंत्रकांना देण्यात आले आहे.