अतिरिक्त दुधापासून भुकटी तयार करण्याची योजना ऑक्टोबरपर्यंत राबविणार - दूग्धविकास मंत्री सुनिल केदार
लॉकडाऊनमध्ये अतिरिक्त दुधाचे भुकटीत रुपांतर करण्याची योजना आता सप्टेंबर आणि ऑक्टोबर या दोन महिन्यांसाठी राबविण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली आहे.
मुंबई - राज्यातील दूध उत्पादकांसाठी राज्य सरकारने दिलासादायक निर्णय घेतला आहे. लॉकडाऊनमध्ये अतिरिक्त दुधाचे भुकटीत रुपांतर करण्याची योजना आता सप्टेंबर आणि ऑक्टोबर या दोन महिन्यांसाठी राबविण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली, अशी घोषणा दूग्धविकास मंत्री सुनील केदार यांनी केली.
ही भुकटी आदिवासी विकास विभागाच्या भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम अमृत आहार या योजनेंतर्गत ६ लाख ५१ हजार मुलांना प्रतिदिन प्रतिविद्यार्थी १८ ग्रॅम याप्रमाणे ६ लाख ५१ हजार मुलांना आणि प्रतिदिन प्रतिमहिला २५ ग्रॅम याप्रमाणे १ लाख २१ हजार गरोदर, स्तनदा मातांना 1 वर्षाकरीता दूग्धव्यवसाय विभागामार्फत उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याचा निर्णयही घेण्यात आला.
संपूर्ण जगभरात कोविड-19 या रोगाचा संसर्ग पसरला आहे. याच पार्श्वभूमिवर घोषित करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे दुधाच्या मागणीत प्रचंड घट झाली होती. राज्यात अतिरिक्त दुधाची परिस्थिती निर्माण होऊन दूध उत्पादक शेतकऱ्यांना दूधासाठी कमी दर प्राप्त होऊ लागला. या अतिरिक्त दुधाच्या परिस्थितीत सुधारणा होऊन दुग्धव्यवसायात समतोल राखता यावा, यासाठी शासनाने हस्तक्षेप करुन प्रतिदिन 10 लक्ष लिटर मर्यादेपर्यंत दूध स्विकृत करुन सदर दुधाचे रुपांतरण करण्याची योजना घोषित केली होती. ही योजना दिनांक 6 एप्रिल ते 31 जुलै 2020 पर्यंत राबविण्यात आली. या योजनेद्वारे शासनामार्फत एकूण 5,98,97,020 लिटर इतक्या दुधाची स्विकृती करण्यात आली असून या दुधाच्या रुपांतरणाद्वारे 4421 मेट्रीक टन दूध भुकटी, 2320 मेट्रिक टन इतके देशी कुकींग बटरचे उत्पादन करण्यात आले. राज्यातील दूग्धव्यवसायात अद्यापही स्थिरता आलेली नसल्याने ही योजना पुन्हा 1 सप्टेंबर ते 31 ऑक्टोबर 2020 या 2 महिन्यांच्या कालावधीसाठी राबविण्यास मान्यता देण्यात आली आहे. या योजनेसाठी शासनामार्फत 198.30 कोटी रुपयांची तरतूद करण्यात येणार आहे, असे मंत्री केदार यांनी सांगितले.