मुंबई :मुंबईतील सफाई कामगारांच्यासाठी ४२ वसाहती सध्या आहेत. यापैकी ३६ वसाहतींचा पुनर्विकास करण्यात येणार आहेत. या पुनर्विकासाच्या माध्यमातून सुमारे १४ हजार घऱांची निर्मिती करण्यात येणार आहे. यामध्ये मुंबईसह पूर्व उपनगर आणि पश्चिम उपनगरातील काही इमारतींचा समावेश आहे. शीशमहल, आंबेडकर नगर, डी वॉर्ड, लाल पाखडिया अशा अनेक वसाहतीचा यात समावेश असल्याची माहिती वामन कविस्कर यांनी दिली आहे. या संदर्भात पालिकेने पुनर्विकासाचा निर्णय घेतला आहे.
विक्रोळीत होणार दोन हजार घरे :विक्रोळी पार्कसाईट येथील सफाई कामगारांच्या घरांसाठी दोन हजार घरांच्या बांधकामासाठी कंत्राटदाराला 35 हजार रुपये चौरस मीटर दर देण्याचे प्रस्तावित आहे. मोक्याच्या ठिकाणी असणाऱ्या या जागेवरील इमारतींचा पुनर्विकास करण्यासाठी महापालिकेने टेंडर प्रसिद्ध केले आहे. यासाठी महापालिकेला ५३७ कोटींचा खर्च करणार आहे. पुनर्विकासानंतर या ठिकाणी 17 मजली एकूण 11 ते 12 इमारती उभ्या राहणार आहेत. सध्या या वसाहतीत 700 ते 800 कुटुंबीय वास्तव्यास आहेत. अशी माहिती पवार यांनी दिली आहे.
जून्या इमारतींचा पुनर्विकास :महापालिका कर्मचाऱ्यांची वसाहत असलेल्या विक्रोळी पार्कसाईट येथील इमारतींमधील अनेक इमारती जुन्या आणि धोकादायक झाल्या आहेत. शिवाय सद्यस्थितीत हजारो कर्मचाऱ्यांच्या निवास व्यवस्थेचा प्रश्नही महापालिकेसमोर आहे. या पार्श्वभूमीवर या ठिकाणच्या इमारतींचा पुनर्विकास करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला असल्याचे उपायुक्त (सुधार) रमेश पवार यांनी सांगितले. या ठिकाणी सुमारे 50 वर्षांहून अधिक जुनी वसाहत आहे. यामध्ये प्रत्येकी तीन मजल्याच्या 28 इमारती आहेत.