मुंबई -राज्यात कोरोना आणि त्यानंतर सुरू झालेल्या लॉकडाऊनमुळे दहावी आणि बारावीच्या पेपर तपासणीला उशीर झाला. मात्र, आता पेपर तपासणी आटोक्यात आली आहे. त्यामुळे जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत बारावीचा आणि जुलैच्या अखेरीस दहावीचा निकाल जाहीर केला जाईल, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी आज दिली. शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला गायकवाड यांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे एक पत्रकार परिषद घेतली त्यावेळी त्यांनी निकालाची सद्यस्थिती सांगितली.
जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात बारावीचा, तर जुलै अखेरीस लागणार दहावीचा निकाल
राज्यात अनेक ठिकाणी लॉकडाऊन स्थितीमुळे दहावी-बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणीवर मोठा परिणाम झाला होता. विशेषत: मुंबई, पुणे सारख्या परिसरात रेड झोनमुळे उत्तरपत्रिका तपासणीसाठी मोठ्या अडचणी आल्या. मात्र, आता उत्तरपत्रिका तपासणीचे काम सुरू झाले असून जुलैमध्ये निकाल लावण्यात येतील, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली.
राज्यात अनेक ठिकाणी लॉकडाऊन स्थितीमुळे दहावी-बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणीवर मोठा परिणाम झाला होता. विशेषत: मुंबई, पुणे सारख्या परिसरात रेड झोनमुळे उत्तरपत्रिका तपासणीसाठी मोठ्या अडचणी आल्या. अनेक विषयांच्या उत्तरपत्रिकांचे गठ्ठे शाळा आणि पोस्ट ऑफिसमध्येच पडून होते. यामुळे उत्तरपत्रिका तपासण्यासाठीचा दोन महिन्यांचा कालावधी वाया गेला. आता लॉकडाऊन संपल्यानंतर राज्य शिक्षण मंडळाच्या सर्वच विभागाने पोस्टाच्या मदतीने दहावी आणि बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणीचे काम करणाऱ्या शिक्षकांपर्यंत पोहचवल्या आहेत. ज्या उत्तरपत्रिकांची तपासणी झाली आहे त्याही जमा करून घेतल्या आहेत. त्यामुळे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ बारावीचा निकाल जुलैच्या दुसर्या आठवड्यापर्यंत लावण्याच्या तयारीत आहे. तर जुलैच्या अखेरीस दहावीचा निकाल जाहीर होईल.