मुंबई: अलीकडेच काही महिन्यांपूर्वी रायगडच्या समुद्रकिनारी सापडलेल्या संशयास्पद बोटीत शस्त्र सापडले. नंतर गेल्या काही दिवसांपूर्वी नववर्षाच्या पूर्वसंध्येला मुंबईतील नेव्हीनगर परिसरात संशयित बोट घिरट्या घालत असल्याची माहिती मिळताच पोलिस आणि नौदलासह सर्व यंत्रणा सतर्क झाल्या होत्या. सागरी पोलिसांचा गस्ती नौकांनी तात्काळ समुद्रात गस्त घातली. मात्र, कोणतीही संशयित बोट सापडली नाही. सागरी सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी पेट्रोलिंग वाढवली आहे. सागरी पोलिसांकडे असलेल्या अनेक बोटी नादुरुस्त असल्याने 12 फिशिंग बोटी भाडेतत्त्वावर घेण्याचा निर्णय घेतला आहे.
फिशिंग बोटी :सध्या मुंबईत पोलिसांकडे अत्याधुनिक स्पीड बोटी आहेत. मात्र, या बोटींच्या देखभाल-दुरुस्तीची जबाबदारी गोव्यातील एका कंपनीकडे आहे. बोट बिघडली किंवा दुरुस्तीसाठी बराच कालावधी जातो. यामुळे नियमित गस्तीवर त्याचा परिणाम होत असल्यामुळे पोलिसांनी कोळी बांधवांकडून फिशिंग बोटी मासिक भाडेतत्त्वावर घेण्यात येत आहेत. प्रत्येक बोटीचे अंदाजे भाडे २ लाख ते २ लाख ५० हजार इतके आहे. साधारणत १२ बोटीच्या भाड्याने महिन्याला १० ते १२ लाख रुपये खर्च करण्यात येणार आहेत.
नियमित गस्त : किनाऱ्यापासून १२ सागरी मैल इतकी हद्द मुंबई पोलिसांकडे येते. त्यापुढील जबाबदारी तटरक्षक दल आणि नौदलाकडे जाते. ११४ किलोमीटरचा समुद्रकिनारा आणि १२ सागरी मैल अंतर या भागात मुंबई पोलिसांची २४ तास गस्त आवश्यक आहे. सकाळ आणि दुपार या दोन्ही वेळेस पोलिसांच्या वतीने गस्त घातली जाते. मात्र, इतर वेळी हा किनारा मोकळाच असतो. विशेष करून रात्रीच्या वेळी अंधारात माफियांचा मोठ्या प्रमाणात काळाबाजार चालतो. यामध्ये इंधन तस्करांचा समावेश अधिक असून सुरक्षेच्या दृष्टीने हे फार धोकादायक आहे.
एकूण 14 बोटी: भाडेतत्त्वावर घेण्यात येणाऱ्या बोटींची तपासणी सागरी पोलिसांकडून करण्यात येत आहेत. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले, की समुद्रात गस्त घालण्यासाठी सागरी पोलिसांकडे गस्ती नौका आहेत. परंतु या नौकांची नियमितपणे देखभाल-दुरुस्ती होत नसल्याने त्या वारंवार बंद पडतात. त्यामुळे आता फिशिंग बोटी भाडेतत्त्वावर घेण्याची वेळ पोलिसांवर आली आहे. बंदर परिमंडळचे पोलिस उपायुक्त संजय लाटकर यांना संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, मुंबई पोलिसांच्या एकूण 14 बोटी आहेत, त्या गस्तीसाठी वापरल्या जातात मात्र भाडेतत्वावर देखील काही बोटी घेण्यात आल्या आहेत.
हेही वाचा: Union Budget 2023 दिलासादायक बजेट असणार अजित मंगरूळकर