मुंबई - देशात सर्वाधिक कोरोनाच्या रुग्णांची संख्या असलेल्या महाराष्ट्राच्या दृष्टीने महत्त्वाचे असे विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन दुसऱ्यांदा पुढे ढकलण्यात आले आहे. राज्यात सध्या कोरोनाचे संकट असतानाच येत्या ३ ऑगस्टपासून विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरु होणार होते. मात्र, कोरोनाचे रुग्ण पाहता पावासाळी अधिवेशन ७ सप्टेंबर पासून घेण्याचा निर्णय आज विधिमंडळाच्या कामकाज सल्लागार समितीची बैठकीत घेण्यात आला.
यंदा पावसाळी अधिवेशन २२ जूनपासून सुरु होणार होते. मात्र, मार्च महिन्यापासून राज्यात असणारे कोरोनाचे संकट यामुळे पावासाळी अधिवेशन पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला होता. तसेच ३ ऑगस्टपासून पावसाळी अधिवेशन अवघ्या दोन ते तीन दिवसांचा बोलावण्याचा विचार राज्य सरकारचा होता. मात्र, अजूनही राज्यात कोरोना रुग्ण संख्या कमी होताना दिसत नसून, अधिवेशन काळात होणारी गर्दी लक्षात घेता ३ ऑगस्टला अधिवेशन घेणे योग्य नसल्याचा निष्कर्ष कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत काढण्यात आला.