मुंबई - देशाची आर्थिक राजधानी म्हणून बिरुद मिरवणाऱ्या मुंबई शहरातील आमदारांचा लेखाजोखा प्रजा फाऊंडेशनने जाहीर केला आहे. भाजप-शिवसेनेचे वर्चस्व असलेल्या मुंबईमध्ये काँग्रेसचे आमदार अमिन पटेल यांनी कार्यकाळातील कामगिरीच्या जोरावर पहिला क्रमांक मिळवला आहे. तसेच, 2019 या वर्षातील कामगिरी बघता शिवसेनेचे आमदार सुनिल शिंदे यांनी पहिला क्रमांक मिळवला आहे. तर, भाजपचे वादग्रस्त आमदार राम कदम यांना पुन्हा एकदा शेवटच्या क्रमांकावर समाधान मानावे लागले आहे.
प्रजा फाउंडेशनच्या अहवालानुसार काँग्रेसचे आमदार अमिन पटेल हे मुंबईतील क्रमांक एकचे आमदार ठरले आहेत. गेली काही वर्ष सातत्याने त्यांनी ही कामगिरी कायम ठेवली आहे. पटेल यांच्यानंतर शिवसेनेचे माजी महापौर आणि विद्यमान आमदार सुनील प्रभू यांनी दुसरा क्रमांक मिळवला आहे. तिसऱ्या क्रमांकावर काँग्रेसचे आमदार असलम शेख यांनी उत्कृष्ट कामगिरी करून बाजी मारली आहे.