मुंबई - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निकटवर्तीयांवर केंद्रीय तपास यंत्रणेचा फास आवळत असला तरी, थेट मुख्यमंत्र्यांवर केंद्रीय तपास यंत्रणा कारवाई करणार नाहीत. केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवाईमुळे उद्धव ठाकरे यांचे राजकीय वर्तुळात वलय कमी होत असल्याचे मत राजकीय विश्लेषक व्यक्त करत आहेत. तर कारवाईला घाबरत नसल्याचे वक्तव्य महा आघाडी सरकारच्या नेत्यांकडून केला जात आहे.
बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते महेश तपासे महाराष्ट्रात केंद्रीय तपास यंत्रणांकडून महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांवर चौकशीचे फेरे लावले जात आहेत. तिथेच माजी गृहमंत्री अनिल देशमुख तसेच मंत्री नवाब मलिक यांना ईडीकडून अटकही झाली आहे. तसेच महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री व इतर नेते केंद्रीय तपास यंत्रणांच्या रडारवर आहेत. नुकतेच खासदार संजय राऊत ( Sanjay Raut ) यांच्या अलिबाग आणि मुंबईतील संपत्तीवर कारवाई करण्यात आली. त्यामुळे केंद्रीय तपास यंत्रणेचा फास महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांवर सातत्याने आवळला जात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यानंतर आता शिवसेनेच्या नेत्यांचा पुढचा नंबर असणार असा थेट इशारा भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांकडून दिला जात आहे. खास करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निकटवर्तीयांवर केंद्रीय तपास यंत्रणेची करडी नजर असलेली पाहायला मिळत आहे.
शरद पवारांकडून ईडीची पंतप्रधानांकडे तक्रार -केंद्रीय तपास यंत्रणांकडून महा विकास आघाडी सरकारमधील नेत्यांवर आणि मंत्र्यांवर कारवाई केली जाईल, असे सातत्याने भारतीय जनता पक्षाकडून सांगण्यात येते. राज्यातील दोन मंत्र्यांना अटक आणि इतर नेत्यांवर सुरू असलेली चौकशी पाहता महाविकास आघाडी सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करेल का?, असे प्रश्नही उपस्थित केले जाऊ लागले आहेत. मात्र, राज्य सरकारला कोणताही धोका नाही. राज्य सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करेल, असा विश्वास खुद्द राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि महाविकास आघाडी सरकारचे सर्वसर्वा शरद पवार यांनी व्यक्त केला आहे. खासदार संजय राऊत यांच्यावर केलेल्या कारवाईनंतर ईडीच्या माध्यमातून महाराष्ट्रात कशाप्रकारे धुडगूस घातला जातोय याची तक्रार थेट शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कानावर घातली. आज दिल्लीत या दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास वीस ते पंचवीस मिनिटे चर्चा झाली असून थेट राजकीय परिस्थितीवर चर्चा न करता केंद्रीय तपास यंत्रणेच्या कार्यपद्धतीवर शरद पवार यांनी पंतप्रधानांच्या भेटीत बोट ठेवले.
मुख्यमंत्री केंद्रीय तपास यंत्रणेच्या कचाट्यात अडकणार? -मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निकटवर्तीय यांवर एकामागून एक केंद्रीय तपास यंत्रणांकडून कारवाई सुरू झाली आहे. प्रताप सरनाईक आणि रवींद्र वायकर या शिवसेना नेते ईडी चौकशीच्या फेऱ्यात आहेत. मात्र आता मुंबई महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे माजी अध्यक्ष यशवंत जाधव यांच्यावर आयकर विभागाकडून करण्यात आलेली कारवाई ही थेट उद्धव ठाकरे यांनाच इशारा होती. तसेच मुख्यमंत्री यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांच्यावरही ईडीकडून कारवाई करण्यात आली. ठाण्यातील नीलांबरी आपारमेंट मधील त्यांच्या 11 फ्लॅट जप्त करण्यात आले. त्यानंतर खासदार संजय राऊत यांच्यावरच ईडीकडून कारवाई करत त्यांची अलिबाग आणि दादर येथील मालमत्तेवर कारवाई करण्यात आली आहे. महा विकास आघाडीचे सरकार पाडण्यासाठी आपल्यावर दबाव आणला जातोय. मात्र आपण अशा कारवाईला घाबरत नाही. केंद्रीय तपास यंत्रणेचा कितीही वापर केला तरी भारतीय जनता पक्षात सोमर आपण झुकणार नाही अस म्हणत संजय राऊत यांनी भारतीय जनता पक्षाविरुद्ध दंड थोपटले आहेत.
ठाकरे यांचे वलय कमी करण्याचा प्रयत्न -केंद्रीय तपास यंत्रणेकडून महा विकास आघाडी सरकारचे नेते तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय यांच्यावर केंद्रीय तपास यंत्रणेकडून कारवाई सुरू असली तरी सध्याची राजकीय परिस्थिती पाहता केंद्रीय तपास यंत्रणा थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर कारवाई करणार नाही. मात्र उद्धव ठाकरे यांचं महाराष्ट्रात राजकीय वर्तुळात असणार वलय कमी करण्याचा प्रयत्न या मागून नक्कीच केला जातोय. याचा परिणाम आता जाणवत नसला तरी येणाऱ्या निवडणुकांमध्ये याचा फटका शिवसेनेला बसू शकेल, असे मत राजकीय विश्लेषक उदय तानपाठक यांच्याकडून व्यक्त करण्यात आले.
भाजपच्या इशार्यावर केंद्रीय तपास यंत्रणा काम करतात- तपासे -मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अत्यंत निकटवर्तीय समजल्या जाणाऱ्या लोकांवर कारवाई झाली आहे. त्यामुळे केंद्रीय तपास यंत्रणेच्या रडारमधून मुख्यमंत्रीही वाचू शकणार नाहीत, अशी अवस्था सध्या महाराष्ट्रात पाहायला मिळत आहे. अशा प्रकारची कारवाई केली जाऊ शकते, अशी शक्यता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते महेश तपासे यांनी व्यक्त केले. केवळ महाराष्ट्रातच नाही तर, पश्चिम बंगाल आणि गोवा येथेही केंद्रीय तपास यंत्रणेचा सुळसुळाट सुरू आहे. भारतीय जनता पक्षाच्या इशाऱ्यावर या तपास यंत्रणा काम करत आहेत. विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणेचा वापर केला जात आहे. मात्र, भारतीय जनता पक्षाच्या या दडपशाहीला आम्ही घाबरत नाही, असा इशारा महेश कापसे यांनी दिला आहे.
हेही वाचा -Mumbai Congress agitation : वाढत्या महागाईच्या विरोधात मुंबई काँग्रेसचे आंदोलन