मुंबई : देशभरातील हजारो संस्कृत प्रेमींच्या उपस्थितीत आज(सोमवार) ऑनलाइन संस्कृत महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाच्या पुढाकाराने आयोजित या संस्कृत महोत्सवाचे उद्घाटन राज्यपाल तथा कुलपती भगतसिंह कोश्यारी यांनी राजभवन, मुंबई येथून डिजिटल माध्यमातून केले. कार्यक्रमाला उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत, राज्यातील विविध विद्यापीठांचे कुलगुरू तसेच संस्कृत विद्वान उपस्थित होते.
नव्या शिक्षण धोरणाप्रमाणे संस्कृत प्रचार प्रसाराचे धोरण ठरवावे : राज्यपाल - कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ बातमी
संस्कृत भाषेचा सर्वांनी सार्थ अभिमान बाळगून तिचा मिशनरी उत्साहाने प्रचार-प्रसार केल्यास संस्कृत पुन्हा जगज्जननी होऊ शकते. शिक्षणाचे नवे धोरण नुकतेच जाहीर झाले आहे. त्याप्रमाणेच संस्कृत प्रचार प्रसाराचे देखील धोरण ठरविण्यासाठी संस्कृत विद्वतजंणांकडून प्रयत्न झाले पाहिजे, असे प्रतिपादन राज्यपाल कोश्यारी यांनी बोलताना केले.
संस्कृत ही भारतातील हिन्दी, मराठी, बंगाली यासह सर्व भाषांची जननी आहे. अनेक ज्ञानविज्ञान शाखांचे ज्ञान या भाषेत उपलब्ध आहे. संस्कृत भाषेसोबत आपल्या देशाची संस्कृती, कला, नाट्य-संगीत जोडले आहे. संस्कृत भाषेचा सर्वांनी सार्थ अभिमान बाळगून तिचा मिशनरी उत्साहाने प्रचार-प्रसार केल्यास संस्कृत पुन्हा जगज्जननी होऊ शकते. शिक्षणाचे नवे धोरण नुकतेच जाहीर झाले आहे. त्याप्रमाणेच संस्कृत प्रचार प्रसाराचे देखील धोरण ठरविण्यासाठी संस्कृत विद्वतजंणांकडून प्रयत्न झाले पाहिजे, असे प्रतिपादन राज्यपाल कोश्यारी यांनी यावेळी बोलताना केले. महाकवी कालिदास हे सर्व कवींचे मुगुटमणी होते असे सांगून कालिदासांचे शाकुंतल वाचून जर्मन विचारवंत ग्योथे हर्षोल्हासित झाले होते याचे स्मरण राज्यपालांनी करून दिले. संस्कृत महोत्सवाच्या माध्यमातून संस्कृत भाषेची प्रतिष्ठा वृद्धिंगत करावी असे आवाहन राज्यपालांनी यावेळी आयोजकांना केले.
संस्कृत महोत्सव केवळ एक दिवस साजरा न करता तो वर्षभर शाळा महाविद्यालयांमधून साजरा करून भावी पिढ्यांना संस्कृतची महत्ता कळवावी अशी सूचना उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी यावेळी केली. करोनाचे संकट संपल्यावर शासनाकडून लवकरच महाकवी कालिदास पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात येईल, असेही त्यांनी संगितले. यावेळी संस्कृत विद्वान प्रा. वेंपती कुटुंबशास्त्री यांना तसेच ‘संभाषण संदेश संस्कृत पत्रिका‘ या मासिकला संस्कृत सेवा सन्मान प्रदान करण्यात आला. महोत्सवाच्या उद्घाटन समारोहानंतर राज्यपाल कोश्यारी यांच्या उपस्थितीत राजभवन मुंबई येथे ‘गीत मेघदूतम‘ हा मेघदूतातील निवडक श्लोकांच्या रसग्रहण आणि गायनाचा कार्यक्रम सादर करण्यात आला. राज्यपालांच्या उपसचिव प्राची जांभेकर यांची संकल्पना आणि निवेदन असलेल्या या कार्यक्रमात धनश्री शेजवलकर यांनी स्वरसाज दिला. संगीत डॉ. केशव चैतन्य कुंटे यांनी दिले. तर, संवादिनी साथ पूनम पंडित यांनी केली.