मुंबई -मुंबईजवळील पी ३०५ 'ओएनजीसी'च्या बार्जला 'तौक्ते' वादळादरम्यान अरबी समुद्रात अपघात झाल्याने, त्यावरील काम करणाऱ्या ३७ 'क्रू मेम्बर्स'चा मृत्यू झाला आहे. याबाबत 'ओएनजी'सी प्रशासनाने आपली जबाबदारी झटकली आहे. एका नामांकित सरकारी कंपनीने आपल्या कंत्राटदाराने नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांबाबत जबाबदारी झटकल्याने कंपनी विरोधात संतापाची लाट उसळली आहे.
'तौक्ते' वादळादरम्यान झाला होता अपघात
सोमवारी १७ मे ला मुंबईत तौक्ते वादळ आले होते. या वादळादरम्यान मुंबईजवळील समुद्रात ओएनजीसीच्या पी 305 या बार्जवर काही कर्मचारी काम करत होते. वादळ येणार आहे असा इशारा देण्यात आला होता, तरी या कर्मचाऱ्यांना समुद्रातून बाहेर काढण्यात आले नव्हते. दरम्यान, या वादळाने समुद्र मोठ्या प्रमाणात खवळल्याने बार्जवर असलेले कर्मचारी समुद्रात अडकले. त्यांना वाचवण्यासाठी नेव्हीने 'रेस्क्यू ऑपरेशन' केले. त्यामध्ये १८६ कर्मचाऱ्यांना वाचवण्यात आले आहे. तर, ३७ जणांचा मृत्यू झाला आहे.
जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न
वादळादरम्यान मृत पावलेले बार्जवरील कर्मचारी नेमक्या कुठल्या भागातील आहेत. त्यांना ओएनजीसी कंपनी किंवा कंत्राटदारांकडून नुकसान भरपाई देण्यात येणार आहे का? याची माहिती मिळवण्यासाठी संपर्क करण्यासाठी सोनाली दुत्ता यांचा क्रमांक देण्यात आला होता. दुत्ता यांना याबाबत संपर्क केला असता, त्यांनी हे कर्मचारी आमचे नसून ते 'एस्कॉन' या कंत्राटदाराचे कर्मचारी आहेत. त्यामुळे त्यांच्याबाबत आम्ही माहिती देऊ शकत नाही, असे उत्तर त्यांनी दिले. तर, एस्कॉन या कंत्राटदार कंपनीशी संपर्क केला असता, आम्ही फक्त कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकांना माहिती देत आहोत. जसे मृतदेह समोर येते आहेत, तसे त्यांचा नातेवाइकांना आम्ही माहिती देत आहोत. आम्ही मीडियाला माहिती देत नाही, असेही त्यांच्याकडून सांगण्यात आले आहे.
कर्मचाऱ्यांची जबाबदारी झटकली जातेय
बार्जवरील कर्मचाऱ्यांच्या मृतदेहाची ओळख करण्याचे काम सुरु आहे. अशा वेळी हे कर्मचारी नेमके कुठले आहेत हे लपवले जात आहे. एखाद्या कंत्राटदाराने नेमलेल्या कर्मचाऱ्याचा अपघात झाला किंवा त्याचा मृत्यू झाल्यास त्या कंत्राटदाराने त्याची जबाबदारी झटकल्यास संबंधित कंपनीला त्याची जबाबदारी घ्यावी लागते. मात्र, 'ओएनजीसी' कंपनी आपली जबाबदारी झटकत असल्याचे दिसत आहे.
हेही वाचा -चंद्राच्या तब्बल 55 हजार फोटोंतून साकारला एकच अद्भुत फोटो; पाहा गॅलरी..
हेही वाचा -'बार्ज पी 305' दुर्घटनेला कॅप्टन कारणीभूत, कर्मचाऱ्यांनी सांगितला थरारक घटाक्रम...