महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'प्लाझ्मा डोनर' मिळवण्यासाठी रुग्णालयांना करावी लागतेय कसरत, जनजागृतीची गरज - कोरोनाबाबात बातमी

राज्यात एकीकडे कोरोनामुक्त होणाऱ्यांचा आकडा वाढत आहे तर दुसरीकडे कोरोनाग्रस्तांचा व मृतांचा आकडाही वाढत आहे. पण, गंभीर रुग्णाला कोरोनामुक्त झालेल्या रुग्णाच्या प्लाझ्माद्वारे बरे करता येते. पण, प्लाझ्मा देण्यासाठी अपेक्षीत कोरोनामुक्त येत नसल्याने जनजागृतीची गरज भासणार आहे.

संग्रहीत छायाचित्र
संग्रहीत छायाचित्र

By

Published : Jun 27, 2020, 1:12 PM IST

मुंबई- राज्यभर आता गंभीर कोरोना रुग्णांवर प्लाझ्मा थेरपीद्वारेही उपचार केले जात आहेत. त्यासाठी अनेक रुग्णालयात बरे झालेल्या कोरोना रुग्णांच्या रक्तातून प्लाझ्मा जमा करण्याचे काम रक्त पेढ्यांद्वारे केले जात आहे. मात्र, याबाबत अद्याप म्हणावी तशी जनजागृती नसल्याने बरे झालेले रुग्ण मोठ्या संख्येने अजून तरी पुढे येताना दिसत नाहीत. त्यामुळे रुग्णांना समजावून सांगत त्यांना प्लाझ्मा दान करण्यासाठी तयार करण्यापर्यंत रक्तपेढ्यांना मोठी कसरत करावी आहे. त्यामुळे जनजागृतीसह यासाठी निश्चित कृती आराखडा तयार करण्याची गरज व्यक्त होत आहे.

बरे झालेल्या रुग्णांच्या शरीरात अँटीबॉडीज तयार होतात. त्यानुसार त्याच्या रक्तातून या अँटीबॉडीज अर्थात प्लाझ्मा काढून तो गंभीर रुग्णांच्या शरीरात टाकला जातो. त्यानंतर प्लाझ्मा थेरपी केलेल्या रुग्णांच्या शरीरात रोगप्रतिकारक शक्ती निर्माण होते. त्यामुळे कोरोनावर मात करता येते. ही थेरपी अनेक देशात यशस्वी ठरल्याने आयसीएमआरने याला मान्यता दिली आहे. त्यानुसार मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयासह काही खासगी रुग्णालयातही प्लाझ्मा थेरपीद्वारे रुग्णांवर यशस्वी उपचार केले जात आहेत.

तर आता गंभीर रुग्ण मोठ्या संख्येने दगावत असल्याने उपचार पद्धतीचा जास्तीत जास्त वापर करावा लागणार असल्याचे म्हटले जात आहे. पण, आता प्लाझ्मा डोनर मिळवणे अवघड ठरत असल्याची माहिती नायर रुग्णालयातील एका डॉक्टरने दिली आहे. नायर रुग्णालयामध्येच सर्वप्रथम प्लाझ्मा रक्तपेढी तयार करण्यात आली. तर याच नायरमध्ये आतापर्यंत 15 रुग्ण प्लाझ्मा थेरपीमुळे बरे झाले आहेत. आतापर्यंत या प्लाझ्मा पेढीत अंदाजे 50 डोनर्सनी प्लाझ्मा दान केला आहे. मात्र, अशा रुग्णांची माहिती मिळवणे, त्यांना संपर्क साधणे आणि त्यांना यासाठी तयार करणे मोठे आव्हान ठरत असल्याचेही डॉक्टरांचे म्हणणे आहे.

प्लाझ्मा दान करण्यासंबंधी नागरिकांमध्ये जनजागृतीच नाही. तर कोरोनाची मोठी भीती अनेकांच्या मनात असल्याने बरे झालेले रुग्ण नंतर रुग्णालयाजवळ फिरकत नसल्याचे ही डॉक्टरांचे म्हणणे आहे. अशात गंभीर रुग्णांची संख्या वाढत असल्याने प्लाझ्मा साठा वाढवणे गरजेचे झाले आहे. त्यामुळे आता आम्ही डिस्चार्ज देतानाच सर्व रुग्णांना याबाबत सांगत आहोत. तब्येत ठणठणीत झाल्यानंतर प्लाझ्मा देण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन ही करत आहोत असेही नायरमधील डॉक्टरांनी सांगितले आहे.

केईएम आणि सायन रुग्णालयातही आता प्लाझ्मा थेरपी व प्लाझ्मा जमा करण्यास सुरुवात झाली आहे. त्यानुसार डोनर येत आहेत. पण, ही संख्या कमी असून येत्या काळात लोकांमध्ये योग्य प्रकारे जनजागृती झाली तर नक्कीच डोनर वाढतील, असा विश्वास प्लाझ्मा पेढीतील डॉक्टर व्यक्त करत आहेत.

हेही वाचा -सोसायटी पदाधिकाऱ्यांना चाप; आता वृत्तपत्र, दूध विक्रेत्यांसह कामगारांना मज्जाव करता येणार नाही

ABOUT THE AUTHOR

...view details