मुंबई- मुंबईमधील नाल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात कचरा टाकला जातो. या कचऱ्यामुळे नाले भरून वाहू लागतात. नाल्यातील पाणी इतर सखल भागात साचते. असे प्रकार रोखण्यासाठी मुंबई महापालिकेने नद्या, मोठे नाल्यांमधील तरंगता कचरा हटवण्यासाठी प्रथमच ट्रॅश बुम तराफ्याचा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी महापालिका ३ वर्षांच्या कामासाठी ४७ कोटी रुपये खर्च करणार आहे. नालेसफाईसाठी करण्यात येणाऱ्या खर्चाच्या ५० टक्के इतकी रक्कम तरंगता कचरा काढण्यासाठी खर्च केली जाणार आहे.
कंत्राटदाराची नियुक्ती
कचरा काढण्यासाठी पालिका करणार 47 कोटींचा खर्च मुंबईतील नद्या व नाल्यांमधील कचरा, गाळ, तरंगता कचरा कधीकधी वाहत समुद्रात जाऊन मिळतो. त्यामुळे समुद्राचे पाणी दूषित होते. या कचऱ्याला रोखण्यासाठी हरित लवाद, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ व न्यायालयानेही पालिकेला आवश्यक उपाययोजना करण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे पालिकेने समुद्रात वाहून जाणारा तरंगता कचरा रोखण्यासाठी 'ट्रॅश बुम तराफा' प्रणालीचा वापर करून मिठी, ओशिवरा, पोईसर, दहिसर, वाकोला नद्या, गजधरबंद, मोगरा आदी मोठ्या नाल्यांमधून तरंगता कचरा बाहेर काढून त्याची विल्हेवाट लावण्यासाठी मे.व्हर्गो स्पेशालिटीज प्रा.लि. या कंत्राटदाराला ४७ कोटी रुपयांचे कंत्राट काम तीन वर्षांसाठी देण्यात येणार आहे.
नालेसफाईच्या ५० टक्के रक्कम
संपूर्ण मुंबईतील नालेसफाईच्या कामांवर सुमारे १०० कोटी रुपये खर्च करते. नालेसफाईची कामे करूनही पहिल्याच पावसात नालेसफाईची पोलखोल होते. अशातच मुंबईतील मोजके नाले, चार नद्या यामधील तरंगता कचरा काढण्यासाठी तब्बल ४७ कोटी रुपये म्हणजे नालेसफाई कामाच्या जवळजवळ ५० टक्के रक्कम या 'ट्रॅश बुम तराफा' प्रणालीवर खर्चण्यात येणार आहे. यासंदर्भातील प्रस्ताव स्थायी समितीच्या आगामी बैठकीत मंजुरीसाठी येणार आहे.
नद्या-नाल्यांची लांबी ६८९ किलोमीटर
मुंबई महापालिका पर्जन्य जलवाहिन्या खात्याच्या माहितीनुसार, मुंबईत शहर व उपनगरे भागात मोठे नाले, छोटे नाले व मिठी नदी यांची एकूण सुमारे ६८९ किलोमीटर आहे. यापैकी मोठ्या नाल्यांची लांबी ही सुमारे २४८ किलोमीटर इतकी आहे. तर छोट्या नाल्यांची लांबी ही सुमारे ४२१ किलोमीटर आहे. याव्यतिरिक्त उर्वरित २० किलोमीटर एवढी लांबी मिठी नदीची आहे.
१०४ टक्के नाले सफाई
संपूर्ण वर्षभरात प्रमुख नाल्यांमधून तीन टप्प्यात सुमारे ४ लाख १३ हजार मेट्रिक टन गाळ काढणे अपेक्षित असते. पालिकेने कंत्राटदारामार्फत यंदाच्या पावसाळापूर्व कामाअंतर्गत ३ लाख ११ हजार ३८१ मेट्रिक टन गाळ काढण्याचे निश्चित केले असताना प्रत्यक्षात ३१ मे अखेरीपर्यंत एकूण ३ लाख २४ हजार २८४ इतका गाळ पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून काढण्यात आला आहे. यामध्ये, शहर भागात ४३ हजार ७६६ मेट्रिक टन, पूर्व उपनगरात १ लाख ६ हजार २६० मेट्रिक टन, पश्चिम उपनगरांमध्ये १ लाख ८२ हजार २८५ मेट्रिक टन एवढा गाळ काढण्यात आला असून, एकूण ११ हजार ४ इतक्या वाहनफेऱ्या करुन १०४ टक्के गाळ वाहून नेण्यात आला आहे. असा दावा पालिकेनेच केला आहे.
हेही वाचा- पैठण नगरपरिषदेचे नालेसफाईचे पितळ उघडे; वसाहतींत शिरले पाणी