मुंबई -महापालिकेच्या केईएम रुग्णालयात उपचार घेताना भाजल्याने हात कापावा लागणाऱ्या प्रिन्स आणि नायर रुग्णालयात एमआरआय मशीनमध्ये अडकून मृत्यू पावलेल्या राजेश मारू यांच्या कुटुंबियांना महापालिकेतर्फे प्रत्येकी १० लाख रुपये देण्याचा निर्णय गटनेत्यांच्या बैठकीत घेण्यात आला आहे. पालिकेच्या चुकीमुळे विविध दुर्घटनांमध्ये जखमी किंवा मृत होणाऱ्यांना आर्थिक मदत देण्यासंबंधीत धोरण बनावे यावर सर्व पक्षीय गटनेत्यांनी मंजुरी दिल्याची माहितीही महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी दिली आहे.
उत्तर प्रदेशातून हृदयविकारावर उपचार घेण्यासाठी प्रिन्स नावाच्या दोन महिन्याच्या बालकाला केईएम रुग्णालयात भरती करण्यात आले होते. उपचार सुरु असताना ईसीजी मशीनमध्ये शॉकसर्किट होऊन गादी जळाल्याने प्रिन्सचा हात, कान, डोक्याचा आणि छातीचा भाग जळाला होता. त्याचा हातदेखील कापण्यात आला. या प्रकरणाचे पडसाद पालिकेच्या स्थायी समिती आणि सभागृहात उमटले होते. रुग्णालयाचे डीन, डॉक्टर आदी कर्मचाऱ्यांच्या निलंबनाची तसेच प्रिन्सच्या कुटुंबियांना १० लाख रुपये देण्याची मागणी करण्यात आली. त्याच्या कुटुंबीयांना पालिकेने ५ लाख रूपये देऊ केले होते. हे ५ लाख रूपये डिपॉझिट म्हणून ठेवण्यात येणार होते. आणि ते प्रिन्स १८ वर्षाचा झाल्यावर वापरता येणार होते. प्रिन्सवर आता खर्च करण्याची गरज असताना पालिका रक्कम देत नसल्याने पालिकेने देऊ केलेले ५ लाख रुपये घेण्यास प्रिन्सच्या आई-वडिलांनी नकार दिला.
याबाबत आज गटनेत्यांच्या बैठकीत पुन्हा चर्चा करण्यात आली. सर्व पक्षीय गटनेत्यांच्या दवबावामुळे प्रशासनाला प्रिन्सच्या कुटुंबियांना १० लाख रुपये देण्याचा निर्णय घ्यावा लागला आहे. सध्या ५ लाख रुपये प्रिन्सच्या कुटुंबीयांना दिले जाणार असून ५ लाख रुपये फिक्स डिपॉझिट म्हणून ठेवले जाणार आहेत. त्यावर मिळणाऱ्या व्याजाच्या रक्कमेतून प्रिन्सवर उपचार आणि शिक्षणाचा खर्च केला जाणार आहे. तसेच पालिकेच्या नायर रुग्णालयात राजेश मारू यांचा एमआरआय मशीनमध्ये अडकून मृत्यू झाला होता. त्यांच्याही कुटुंबीयाना १० लाख रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे महापौरांनी सांगितले.