मुंबई: आमदार नितेश राणे यांनी पत्र देऊन केलेल्या मागणीवर पालिकेकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे. गिरगाव येथील दर्शक गॅलरीच्या अनुषंगाने जनमानसात गैरसमज पसरावणाऱ्या बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत. या अनुषंगाने मुंबई महापालिकेने आवश्यक त्या यंत्रणांच्या परवानग्या घेण्यात आल्या आहेत. यात महाराष्ट्र राज्य सागरी किनारा व्यवस्थापन (SEIAA), पुरातत्वीय समिती, उच्च न्यायालयाने नियुक्त केलेली विशेष समिती यांच्याही परवानग्या घेऊन ही दर्शक गॅलरी उभारण्यात येत असल्याचा खुलासा पालिका प्रशासनाकडून करण्यात आला आहे.
काय आहे राणे यांच्या पत्रात? मुंबईला पर्यटनाच्यादृष्टीने सुशोभित करून पर्यटनकांना आकर्षित केलेच पाहिजे, ही आमचीपण भूमिका आहे. पण असे करताना कुठल्याही अवैध कार्यपद्धतीने जनतेच्या पैशाचा गैरवापर होता कामा नये. हे पाहण्याची सर्वस्वी जबाबदारी कायद्याने आपल्यावर टाकली आहे. दक्षिण मुंबईतील गिरगाव चौपाटीवर मुंबई महापालिकेच्या वतीने नवीन प्रेक्षक गॅलरी उभारण्याचे काम सुरू आहे. या गिरगाव चौपाटीच्या उत्तर टोकाला कविवर्य भा. रा. तांबे चौकालगत पावसाचे पाणी समुद्रात वाहून नेणारी पालिकेची पर्जन्य जलवाहिनी आहे. याच पर्जन्य जलवाहिनीच्यावर सुमारे ४७५ चौरस मीटर आकाराची दर्शक गॅलरी उभारण्यात येत आहे.