मुंबई - महाराष्ट्रसह मुंबईत मास्क वापरणे सक्तीचे होते, त्यातही शिथिलता देण्यात आली आहे. खासगी वाहनांतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मास्कच्या कारवाईतून वगळण्याचे तोंडी आदेश पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी प्रशासनाला आणि क्लिनअप मार्शलला दिले आहेत.
मास्कची सक्ती
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे देशासह राज्यातही टाळेबंदी लागू करण्यात आली होती. सर्व उद्योगधंदे आणि व्यवसाय यानंतर ठप्प झाले. कोरोनाला प्रतिबंधासाठी मुंबईसह राज्यातील आरोग्य यंत्रणा सतर्क झाल्या. हात धुणे, गर्दी टाळणे आणि मास्क परिधान सक्तीचे केले. मुंबई शहरासह उपनगरात नो मास्क, नो एन्ट्री असे अभियान राबविण्यात आले. मास्क परिधान न केलेल्या प्रवाशांना प्रवासास बंदी घातली. विनामास्क प्रवाशी आढळल्यास त्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली. खासगी वाहनांना देखील हा नियम लागू केला. सध्या कोरोना उतरणीला लागला आहे. लसीकरण मोहिम देखील राज्यात सुरू झाले आहे. या पार्श्वभूमीवर पालिका आयुक्त इक्बाल चहल यांनी खासगी वाहनातील प्रवाशांना मास्क परिधान करणे सक्तीचे नाही. त्यामुळे पालिका प्रशासन आणि क्लिन-अप मार्शलने अशा वाहनातून विनामास्क प्रवास करणाऱ्यांना दंड आकारु नये, असे निर्देश दिले आहेत. लवकरच यासंदर्भातील परिपत्रक काढले जाईल. मात्र, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था असलेल्या रिक्षा, टॅक्सी, बस, टॅम्पो, लोकल आदी वाहनांतील प्रवाशांना मास्क परिधान करणे सक्तीचे आहे. त्यामुळे असे प्रवाशी विनामास्क आढळल्यास कारवाई करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत.