मुंबई- दिवाळीच्या पार्श्वभूमीवर एसटी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 5 टक्के वाढ करण्यात आली असून दिवाळीची भेट म्हणून अधिकाऱ्यांना 5 हजार रूपये तर कर्मचाऱ्यांना 2 हजार 500 रूपये देण्यात येणार असल्याची घोषणा परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष ॲड. अनिल परब यांनी एसटी महामंडळाच्या अधिकारी-कर्मचारी वर्गाला दिवाळीची गोड भेट दिली आहे. यांनी सोमवारी (दि. 25) केली. या निर्णयाचा लाभ महामंडळाच्या सुमारे 93 हजारांहून अधिक कर्मचारी-अधिकाऱ्यांना होणार आहे. विशेष म्हणजे प्रत्येक महिन्याच्या 7 तारखेला होणार पगार यंदा मात्र नोव्हेंबरच्या 1 तारखेला म्हणजे दिवाळीपूर्वी होणार आहे, असेही त्यांनी सांगितले.
कामगारांच्या इशाऱ्यानंतर परिवहन मंत्र्यांची घोषणा
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातील कर्मचाऱ्यांना ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्याचे वेतन दिवाळीपूर्वी अदा करावे तसेच महागाई भत्ता, घरभाडे भत्ता, वार्षिक वेतनवाढीचा दर शासनाप्रमाणे लागू करून थकबाकीची रक्कम एक रकमी दिवाळीपूर्वी देण्यासंदर्भात एसटी प्रशासनाकडे एसटी महामंडळातील सर्व संघटनांच्या संयुक्त कृती समितीच्या वतीने मागणी केली आहे. अन्यथा 27 ऑक्टोबर, 2021 रोजी राज्यभर बेमुदत उपोषण करण्याची घोषणा केली होती. तसेच या राज्यभर बेमुदत उपोषणत महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातील संयुक्त कृती समितीत महाराष्ट्र एसटी वर्कर्स कॉंग्रेस (इंटक), महाराष्ट्र एसटी कामगार संघटना, महाराष्ट्र एसटी कामगार सेना, कास्ट्राईब एसटी कर्मचारी संघटना, महाराष्ट्र मोटार कामगार फेडरेशन यासह एकूण 17 संघटना सहभागी होणार असल्याचे जाहीर केले होते. कामगारांचा या इशाऱ्यानंतर आज परिवहन मंत्र्यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात पाच टक्के वाढ केली आहे.