आता 'एफडीए' करणार खबऱ्यांचे जाळे आणखी मजबूत, नागरिकांनाही माहिती देण्याचे आवाहन - एफडीए बातमी
कोरोनावरील रेमडेसीवीर व टॉसीलीझुमाब या दोन इंजेक्शनचा काळाबाजार सुरू आहे. याला आळा घालण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने खबऱ्यांचे जाळे मजबूत केले आहे. खबऱ्यांसाठी विशेष निधी म्हणून दहा लाखांचा निधी सरकारकडून मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे खबऱ्यांसह सामान्य नागरिकांनीही याबाबत माहिती दिल्यास त्यांचे नाव गुपित ठेवून त्यांनाही मानधन देण्यात येणार असल्याचे एफडीएकडून सांगण्यात आले आहे.
मुंबई- कोरोनावरील रेमडेसीवीर आणि टॉसीलीझुमाब या दोन इंजेक्शनचा काळाबाजार सध्या जोरात सुरू आहे. रुग्णांची मोठी आर्थिक लूट याद्वारे होत आहे. त्यामुळे आता अन्न आणि औषध प्रशासनने (एफडीए) याविरोधातील कारवाई तीव्र केली आहे. तर आता ही कारवाईला आणखी वेग येणार आहे. कारण एफडीएकडून आता खबऱ्याचे जाळे आणखी मजबूत करण्यात येणार आहे. त्यासाठी 10 लाखांचा निधी राज्य सरकारकडून मंजूर करण्यात आल्याची माहिती एफडीएचे आयुक्त अरुण उन्हाळे यांनी दिली आहे. तर नागरिकांनीही कोरोनावरीलच नव्हे तर इतर कोणत्याही औषधांचा काळाबाजार होत असेल तर एफडीएला माहिती द्यावी, माहिती देण्याऱ्याचे नाव गुपित ठेवण्यात येईल तसेच प्रोत्साहन म्हणून योग्य ते मानधनही दिले जाईल, असे आवाहनही उन्हाळे यांनी केले आहे.
औषधांच्या काळ्याबाजाराविरोधात तसेच अन्न भेसळ, प्रतिबंधित अन्न पदार्थांची विक्री-उत्पादन करणाऱ्यांविरोधात एफडीएकडून कारवाई केली जाते. एफडीएला सर्वसामान्य नागरिकांच्या तक्रारी येतात. त्यानुसार एफडीए कारवाई करते. तर अनेकदा एफडीएच्या गुप्तवार्ता विभागाला खबऱ्याकडून माहिती मिळते. खबऱ्यांकडून बऱ्याचदा योग्य व ठोस माहिती मिळते, असा एफडीएच्या दक्षता विभागाचा अनुभव आहे. पण, त्याचवेळी या खबऱ्यांना काही पैसे मोजावे लागतात. त्यांची मानधनाची अपेक्षा असते. अशात कोरोना काळात रेमडेसीवीर आणि टॉसीलीझुमाब औषधाचा काळाबाजार वाढला आहे. तेव्हा यासंबंधीची माहिती खबऱ्यांकडून मिळणे सोपे व्हावे यासाठी त्यांना त्यांच्या कामाप्रमाणे मानधन देण्याचा निर्णय एफडीएने घेतला आहे. त्यानुसार राज्य सरकारकडे यासाठी निधीची मागणी करण्यात आली होती, अशी माहिती एफडीएचे सहआयुक्त सुनील भारद्वाज यांनी दिली आहे.
एफडीएची ही मागणी सरकारने अखेर मंजूर केली असून लवकरच 10 लाखांचा निधी एफडीएला मिळणार आहे. त्यामुळे आता खबऱ्यांना मानधन देता येईल. त्यांच्याकडून माहिती मिळवत कारवाईला वेग देता येईल, असेही भारद्वाज यांनी सांगितले आहे. तर महत्त्वाचे म्हणजे नागरिकांनी ही काळ्याबाजाराची काही माहिती दिली तर त्यांचे नाव गुप्त ठेवत त्यांना ही मानधन देऊ, असे आवाहनही त्यांनी केले.