मुंबई :Mahadev Betting app Case : छत्तीसगड येथून सुरुवात झालेल्या महादेव बेटिंग ॲपबाबत मुंबईत माटुंगा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्यामध्ये अनेक व्यक्तींची नावं आहेत. बॉलिवूडमधील काही सेलिब्रिटींची देखील यामध्ये नावं आहेत. ही केस माटुंगा पोलीस ठाण्यातून मुंबई पोलीस गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आली. त्यानंतर 26 नोव्हेंबर 2023 रोजी मुंबई पोलीस गुन्हे शाखेकडून विशेष तपास पथक गठीत करण्यात आलं. त्यानंतर याचा देशभर तपास करण्याबाबतची दिशा निश्चित केली गेली.
दुबईतून घेतलं ताब्यात : या सर्व प्रकरणांमध्ये अंमलबजावणी संचालनालयास रवी उप्पल याच्या संदर्भातले धागेदोरे मिळाले होते. अंमलबजावणी संचालनालयाने रेड कॉर्नर नोटीस जारी केली. मुंबई पोलिसांना त्याबाबत सूचना दिली. त्यानंतर दुबईमध्ये मुंबई पोलिसांनी रवी उप्पल याला ताब्यात घेऊन, त्याच्याकडून चौकशी सुरू केली. त्या चौकशीतून अनेक बाबी समोर येत गेल्या. सूत्रांच्या, माहितीनुसार रवी उप्पल याला जेव्हा दुबईमध्ये अटक केली, तेव्हा 6000 कोटी रुपयांचा बेकायदेशीर आर्थिक गैरव्यवहार झाला असल्याची माहिती समोर आली. सट्टेबाजांमध्ये सौरभ चंद्रकार, रवी उप्पल त्याशिवाय बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रेटी देखील यामध्ये सहभागी असल्याचं रवी उप्पलकडून पोलिसांना समजलय.
गुन्हे शाखेला माहिती मिळाली : मुंबई गुन्हे शाखेच्या विशेष तपास पथकाने यामधील एक आरोपी सौरभ चंद्राकर आणि मूळ ॲप सुरू करणारा रवी उप्पल यांचा मागोवा घेतला. दुबईमध्ये रवी उप्पल याला दोन आठवड्यापूर्वी मुंबई पोलिसांनी ताब्यात घेऊन काही एक चौकशी केली होती. अंमलबजावणी संचालनालय मुंबई विभाग यांच्याकडून देखील रवी उप्पल याच्या संदर्भात चौकशी सुरू आहे. या चौकशीतूनच दीक्षित कोठारी याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली. विशेष तपास पथकाने दीक्षित कोठारी याला अटक केली.
11 जानेवारी पर्यंत त्याला पोलीस कोठडी : संयुक्त अरब अमिराती या ठिकाणी सौरभ चंद्राकर, रवी उप्पल यांनी थाटमाटाने लग्नाचा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमासाठी सुमारे 200 कोटी रुपये खर्च केले गेले अशी देखील माहिती तपास यंत्रणांना मिळाली. त्यामुळेच भारतातील भोपाळ, मुंबई, कलकत्ता आणि भारताबाहेर दुबई संयुक्त अरब अमिराती अशा अनेक ठिकाणी अंमलबजावणी संचालनालयाकडून छापे मारले गेले. त्या सर्व छापेमारीनंतर धागेदोरे हाती आले. त्यानंतर हा पहिला आरोपी दीक्षित कोठारी याला मुंबई गुन्हे शाखेनं अटक केली. आता 11 जानेवारीपर्यंत त्याला पोलीस कोठडी सुनावली. छत्तीसगड प्रदेशातील रायपूर येथील प्रिव्हेन्शन ऑफ मनी लाॅंडरिंग न्यायालयाने संशयितांच्या विरुद्ध जामीन वॉरंट जारी केलंय, अशी माहितीही तपास यंत्रणेच्या अधिकाऱ्यांनी दिलीय.