मुंबई- कोरोनाचा विषाणू थेट फुफ्फुसावर हल्ला करत असून ज्यांच्यात कोरोना आजार बळावत आहेत, त्यांना श्वसनाचे विकार होत आहेत. तर अनेक रुग्णांना घरीही ऑक्सिजनची गरज पडत आहे. अशावेळी ऑक्सिजन सिलेंडरची गरज पडत आहे. पण, रुग्णांकडून आता ऑक्सिजन कंसंट्रेटरला पसंती दिली जात असल्याने गेल्या दोन-तीन महिन्यांत ऑक्सिजन कंसंट्रेटरच्या मागणीत प्रचंड वाढ झाली आहे. पण, बाजारात त्या तुलनेत याचा पुरवठा कमी असल्याने काहींची गैरसोय होत आहे, हे मशीन मिळण्यासाठी वाट पाहावी लागत असल्याचे चित्र आहे.
कोरोनामध्ये ताप येऊन काही रूग्ण गंभीर होतात. या गंभीर रुग्णांच्या फुफ्फुसावर कोरोनाचे विषाणू मोठा आघात करतात. त्यातून पुढे श्वास घेण्यास त्रास होतो आणि मग ऑक्सिजनची गरज लागत आहे. महत्वाचे म्हणजे रुग्णालयात ऑक्सिजन लागत आहेच, पण अनेक रुग्णांना घरी ही ऑक्सिजन लागत आहे. तसा सल्ला डॉक्टर देत आहेत. त्यामुळे ऑक्सिजन सिलेंडरची गरज पडत आहे. मात्र, आता ऑक्सिजन सिलेंडरला एक चांगला आणि कायमस्वरूपी पर्याय उपलब्ध झाला आहे. तो म्हणजे ऑक्सिजन कंसंट्रेटर. ऑक्सिजन सिलेंडरमधील ऑक्सिजन संपले की ते पुन्हा भरून आणावे लागते. नेहमी नेहमी ही प्रक्रिया करावी लागते. ही खर्चिक आणि वेळखाऊ प्रक्रिया असते. पण, ऑक्सिजन कंसंट्रेटर एकदा का खरेदी केली की विषय संपतो. फक्त त्यात काही बिघाड झाला तरच दुरुस्तीसारख्या गोष्टी कराव्या लागतात.
ऑक्सिजन कंसंट्रेटर हे विजेवर चालणारे मशीन आहे. त्यामुळे कोरोना काळात याला मोठी पसंती मिळत आहे. गेल्या दोन महिन्यात याची मागणी प्रचंड वाढली आहे. त्यामुळे काही अंशी याचा पुरवठ्यामध्ये तूट जाणवत आहे. मात्र, शक्य तितक्या लवकर ग्राहकांना ऑक्सिजन कंसंट्रेटर उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न असल्याची माहिती एका डिस्ट्रीब्यूटरने नाव न छापण्याच्या अटीवर दिली आहे. विजेवर चालणारे मशीन असून हवा शोषून घेते ऑक्सिजन तयार करत रुग्णाला ऑक्सिजनचा पुरवठा करण्याचे काम करत असल्याचे ही त्याने सांगितले आहे.
कोरोनाचा संसर्ग झालेल्या व्यक्तीच्या फुफ्फुसात जखम झाल्यास किंवा तीव्र न्यूमोनिया झाल्यास रुग्णाला डिस्चार्ज दिल्यानंतरही घरी ऑक्सिजन वापरण्यास सांगण्यात येते. अशावेळी ऑक्सिजन सिलेंडरपेक्षा ऑक्सिजन कंसंट्रेटरचा पर्याय चांगला ठरतो. त्यामुळे ऑक्सिजन कंसंट्रेटरलाच आज मोठी मागणी आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य वैद्यकीय परिषदेचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ हृदयरोग तज्ज्ञ डॉ. शिवकुमार उत्तुरे यांनी दिली आहे. यासाठी डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनची गरज नसते. कुणीही याची खरेदी करू शकतो. ज्याला ऑक्सिजनची गरज आहे. ते हे वापरू शकतात असेही त्यांनी सांगितले आहे. पण, डॉक्टरांच्या सल्ल्यानेच याचा वापर करणे कधीही योग्य आहे, असे ते म्हणाले.
भाड्यानेही मिळते मशीन