मुंबई- मुंबई ते पुण्यादरम्यान दररोज धावणाऱ्या आणि चाकरमान्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग असलेली दख्खनची राणी अर्थात डेक्कन क्वीन एक्स्प्रेस ( Deccan Queen Express ) आता नव्या व आकर्षक डब्यांसह धावण्यासाठी सज्ज झाली आहे. चेन्नई येथील इंटिग्रल कोच फॅक्टरी (आयसीएफ) मधून डेक्कन क्वीनसाठी नवे 16 डबे मुंबईत दाखल झाले आहेत. लवकरच डेक्कन क्वीनच्या डायनिंग डबलचा कोचही मुंबईत दाखल होणार असून मार्च महिन्यात नव्या रुपात आणि नव्या रंग रुपात डेक्कन क्वीन एक्स्प्रेस धावणार असल्याची माहिती मध्य रेल्वेचा एका अधिकाऱ्याने दिली आहे.
16 डबे मुंबई दाखल- भारतीय रेल्वेमध्ये प्रतिष्ठित आणि ऐतिहासिक रेल्वे असा मान मुंबई-पुणे डेक्कन क्वीनला आहे. या गाडीला चाकरमानी दख्खनची राणी म्हणून संबोधतात. जून 1930 पासून डेक्कन क्वीन हे मुंबई ते पुणे दरम्यान धावत आहे. तेव्हापासून या गाडीला डायनिंग कार आहे. दोन वर्षांपूर्वी या दख्खनची राणीला अत्याधुनिक लिंक-हॉफमन-बुश (एलएचबी) डबे लावण्याची योजना रेल्वेने आखली होती. मात्र, डायनिंग डब्यामुळे एलएचबी डबे जोडण्यात तांत्रिक अडचणी येत होत्या. मात्र, आता या अडचणींवर मात करून एलएचबी बनावटीची डायनिंग कार तयार करण्यात आली आहे. डेक्कन क्वीनला भारतीय रेल्वेमधील एलएचबी डायनिंग कार असलेल्या पहिल्या रेल्वेचा मान मिळणार आहे. सध्या चेन्नईतील इंटिग्रल कोच फॅक्टरी (आयसीएफ)मधून डेक्कन क्वीनचे 16 डबे तयार हुन मुंबईत दाखल झाले आहेत.