मुंबई- बंगळुरुतून 23 जानेवारीला निघालेली पहिली स्वदेशी आणि ड्रायव्हरलेस मेट्रो रेल्वे गुरुवारी (दि. 28 जाने.) मध्यरात्री 1 वाजण्याच्या सुमारास मुंबईत दाखल झाली आहे. ही मेट्रो नक्की कशी आहे याची पहिली झलक मुंबईकरांना उद्या (दि. 29 जाने.) पाहायला मिळणार आहे. उद्या (मंगळवारी) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते या मेट्रोचे अनावरण होणार असल्याचे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (एमएमआरडीए) जाहीर करण्यात आले आहे.
मान्यवरांच्या उपस्थितीत रंगणार सोहळा
बंगळुरुवरून आलेली मेट्रो सध्या चारकोप मेट्रो स्टेशन येथे ठेवण्यात आली आहे. उद्या (दि. 29 जाने.) दुपारी 3 वाजता या मेट्रोचे अनावरण मुख्यमंत्र्याच्या हस्ते होईल. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, नगरविकास मंत्री आणि एमएमआरडीएचे अध्यक्ष एकनाथ शिंदे, मुंबई उपनगराचे पालकमंत्री आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत अनावरण सोहळा पार पडणार आहे.