मुंबई -'ब्रेक दि चेन'मधील निर्बंधांची अतिशय काटेकोरपणे अंमलबजावणी होईल याकडे विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, पालिका आयुक्त, पोलिसांनी लक्ष ठेवावे, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज (दि. 14 एप्रिल) झालेल्या बैठकीत दिले आहेत. राज्यातील निर्बंधांची काटेकोर अंमलबजावणी झालीच पाहिजे. तसेच टाळेबंदीमध्ये नियम मोडणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेशही झालेल्या बैठकीत दिले.
गेल्या वेळेस कोरोनाचा संसर्ग रोखून दाखविला होता. मात्र, आताची परीक्षा अधिक कठीण व आव्हानात्मक आहे त्यामुळे "ब्रेक दि चेन"मधील निर्बंधांची अतिशय काटेकोरपणे अंमलबजावणी होईल याकडे सर्व जिल्हाधिकारी तसेच पोलीस यंत्रणेने लक्ष द्यावे. कोणत्याही परिस्थितीत आपल्याला गाफील राहून चालणार नाही आणि संसर्ग आणखी फैलावलेला परवडणार नाही, असे सांगून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जिल्हा प्रशासनाला अधिक दक्ष राहण्यास सांगितले. आज ते सर्व विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी, पालिका आयुक्त तसेच पोलीस अधिकाऱ्यांसमवेत आयोजित बैठकीत बोलत होते. दूरदृश्य प्रणालीद्वारे ही बैठक आयोजित करण्यात आली होती. अंमलबजावणी करताना मनात गोंधळ ठेवू नका व स्पष्टता ठेवा, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
यावेळी राज्य शासनाने दुर्बल घटकातील व गरीब लोकांसाठी जाहीर केलेले आर्थिक सहाय व्यवस्थित त्यांच्यापर्यंत पोहोचावे तसेच कोणत्याही तक्रारी येणार नाही यादृष्टीने चांगले नियोजन करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या.
पावसाळ्यापूर्वी जम्बो सुविधा तपासा, फायर ऑडीट करुन घ्या
मुख्यमंत्री म्हणाले की, कोरोना विषाणूचे म्युटेशन झालेले आपल्याकडील नमुन्यांमध्ये आढळले आहे. गेल्या वर्षीपेक्षा संसर्गाचा वेग खूप जास्त आहे. तरुण पिढी जास्त संसर्गित झाली आहे. ऑक्सिजन उपलब्ध करून घेण्यासाठी आपण युद्ध पातळीवर प्रयत्न करीत आहोत. जिल्ह्यांच्या डॉक्टर्सनी बदललेल्या उपचार पद्धतींबाबत नेमकेपणाने काय करायचे ते राज्याच्या तज्ञ टास्क फोर्सकडून समजून घ्यावे.