मुंबई- राज्यात मतदारांचा टक्का वाढविण्यासाठी निवडणूक आयोगाने कंबर कसली आहे. आजपासून (दि. 1 नोव्हेंबर) विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम हाती घेतला असून या मोहिमेत जास्तीत जास्त महिला नवमतदारांची नोंदणीसाठी महिलांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी केले आहे.
1 ते 30 नोव्हेंबर, 2021 या कालावधीत राज्यात विशेष पुनरीक्षण कार्यक्रमाच्या उद्देशाने ऑनलाइन बैठकीचे आयोजन केले होते. महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. हेमंत वसेकर, सर्व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, प्रकल्प संचालक, राज्य निवडणूक अधिकारी कार्यालयाचे स्वीय सल्लागार दिलीप शिंदे आदी या बैठकीला उपस्थित होते.
विशेष ग्रामसभा आयोजित करा
जास्तीत जास्त महिलांची मतदार नोंदणी करण्याकरिता त्यांच्यापर्यंत संदेश घेऊन जाणे आवश्यक आहे. नवविवाहितेचे नाव तिच्या सासरकडील मतदार यादीत होण्यासाठी तीच्यापर्यंत जावे, यासाठी विविध माध्यमांचा उपयोग करण्यात यावा. मतदार यादीत महिलांना नाव नोंदणी करावयाची आहे, ही माहिती जर एका महिलेपर्यंत गेली तरी ती सर्व कुटुंबापर्यंत जाते. नाव नोंदणीची प्रक्रिया अत्यंत सोपी करण्यात आली आहे. दिनांक 13 व 14 नोव्हेंबर आणि 26 व 27 नोव्हेंबर, 2021 रोजी विशेष मतदार नोंदणी शिबिरे घेण्यात येत असून दिनांक 16 नोव्हेंबर, 2021 रोजी विशेष ग्रामसभेचे आयोजित करण्यात येणार आहे. या ग्रामसभेत मतदार यादीचे वाचन करण्यात येणार आहे, असे देशपांडे म्हणाले.
आवश्यक मदत करणार
राज्यातील नवमतदार, तृतीयपंथी तसेच दिव्यांगांचे नाव मतदार यादीत समाविष्ठ होण्यासाठी आवश्यक ती लागणारी सर्व मदत 'उमेद'मधील सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने पूर्ण केली जाईल, अशी ग्वाही महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानचे मुख्य कार्यकारी अधिकारी वसेकर यांनी यावेळी दिली.
हे ही वाचा -100 कोटी वसुली प्रकरणात CBI कडून पहिली अटक.. आता नवीन खुलासे होण्याची शक्यता