मुंबई - परमवीर सिंह यांच्या विरुद्ध अॅट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्या प्रकरणाची आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी झाली. परमवीर सिंह यांच्याविरोधात दाखल केलेला गुन्हा हा बदला घेण्याच्या भावनेतून नाही. तर, पोलीस निरीक्षक भीमराव घाडगे यांच्या तक्रारीत तथ्य वाटत असल्याने हा गुन्हा दाखल केलेला आहे, असे स्पष्टीकरण राज्य सरकारने मुंबई उच्च न्यायालयात दिले. एफआयार रद्द करण्यासाठी परमवीर सिंह यांनी दाखल केलेल्या याचिकेवर हायकोर्टात उद्या परत सुनावणी होणार आहे.
काय आहे प्रकरण?
२० एप्रिलला पोलीस निरीक्षक घाडगे यांनी परमवीर सिंह यांच्या विरोधात आपल्या वरिष्ठांसह राज्य सरकारकडे तक्रार केली होती. त्यानंतर अॅट्रोसिटी कायद्याच्या विविध २२ कलमांन्वये हा गुन्हा दाखल करण्यात आला. या तक्रारीविरोधात परमवीर सिंह यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. 'परमवीर सिंह यांच्याकडे ठाणे पोलीस आयुक्त पदाचा पदभार असताना त्यांनी हजारो कोटींचा भ्रष्ट्राचार केला' अशी तक्रार पोलीस निरीक्षक भीमराव घाडगे यांनी केलेली आहे. संबधित तक्रार घाडगे यांनी मुख्यमंत्री, गृहमंत्री, पोलीस महासंचालक यांच्याकडे केली होती. तसेच, परमवीर सिंह यांच्यासह २७ पोलीस अधिकाऱ्यांवर भीमराव घाडगे यांनी जातीवाचक शिवीगाळ केल्याची तक्रार सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. अकोला येथील कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये झिरो एफआयआर करुन, हे प्रकरण आता ठाणे येथील बाजारपेठ पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आले आहे.
हेही वाचा -कोरोनाचा क्रिकेट जगताला झटका; आयपीएलनंतर आता आशिया कप स्पर्धा रद्द
हेही वाचा -सुप्रिया सुळे मला धमकावतात -जयश्री पाटील यांचा गंभीर आरोप, ईडीकडे नोंदवला जबाब