मुंबई- तौक्ते चक्रीवादळाचा फटका बीकेसी जम्बो कोविड सेंटरला बसल्याच्या बातम्या कालपासून झळकत आहेत. तर विरोधकांनीही या सेंटरचे खूप मोठे नुकसान झाल्याचा प्रचार सुरू केला आहे. पण, प्रत्यक्षात मात्र बीकेसी कोविड सेंटरचे कोणतेही नुकसान झालेले नाही. मी आताच सेंटरची पाहणी केली. तेव्हा खोट्या, चुकीच्या गोष्टी मांडून चांगल्या डॉक्टरांचे, अधिकाऱ्यांचे आणि आरोग्य कर्मचाऱ्यांचे खच्चीकरण विरोधकानी करू नये, अशा बाबतीत तरी राजकारण करू नये, असे म्हणत मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी विरोधकावर निशाणा साधला आहे. तर वादळाच्या पार्श्वभूमीवर रुग्णांना वेळेत इतत्र हलवण्यासह सेंटरचे नुकसान होऊ नये म्हणून सेंटरचे अधिष्ठाता डॉ. राजेश डेरे आणि पथकाकडून करण्यात आलेल्या उपाययोजनाचे कौतुकही यावेळी महापौरांनी केले.
182 रुग्ण सुरक्षितपणे स्थलांतरीत
तौक्ते वादळाचा इशारा मिळाल्याबरोबर पालिकेने बीकेसी कोविड सेंटरमधील रुग्णांना इतर रुग्णालयात हलविण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार डॉ. डेरे आणि त्यांच्या पथकाने सर्व नियोजन करत रविवारीच (दि.16मे) 182 रुग्णांना सेव्हन हिल्स, सायन आणि इतर रुग्णालयात सुरक्षितरित्या हलवले. यासाठी त्यांनी मोठी मेहनत घेतल्याचे यावेळी महापौरांनी सांगितले. त्याचवेळी सेंटरला वादळाचा आणि पावसाचा मोठा फटका बसू नये यासाठी ही ज्या काही उपाययोजना करता येतील त्याही त्यांनी केल्या. लसीकरण केंद्राबाहेरील मंडप आणि त्यातील सामान काढून ठेवले. एकूणच चांगले काम वादळादरम्यान डॉ. डेरे आणि पथकाने केले, अशा शब्दांत महापौरांनी कौतुक केले.