महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कोविड केअर सेंटर कंत्राटदारांचे खिसे भरण्यासाठी; भाजपचा आरोप - मुंबई कोविड केअर सेंटर न्यूज

मुंबईत कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने रुग्णालये अपुरी पडत आहेत. रुग्णांवर उपचार करता यावेत म्हणून पालिकेने वरळी, गोरेगाव, बिकेसी(वांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स) येथे कोविड केअर सेंटर उभारली आहेत. ही केंद्र कंत्राटदारांची खिसे भरण्यासाठीच बनवली असल्याचा आरोप भाजपचे महानगरपालिकेतील गटनेते प्रभाकर शिंदे यांनी केला आहे.

COVID Care Center
कोविड केअर सेंटर

By

Published : Jun 9, 2020, 7:52 PM IST

Updated : Jun 9, 2020, 8:13 PM IST

मुंबई - महानगरपालिकेने मुंबईत ठिकठिकाणी उभारलेल्या कोविड केअर सेंटरमध्ये पावसाळ्यात पाणी शिरून त्याचा रुग्णांना त्रास होणार आहे. ही केंद्र कंत्राटदारांची खिसे भरण्यासाठीच बनवली असल्याचा आरोप भाजपचे महानगरपालिकेतील गटनेते प्रभाकर शिंदे यांनी केला आहे. अशी सेंटर उभारण्यापेक्षा पालिकेने रिक्त इमारती ताब्यात घेऊन कोविड सेंटर उभारावीत, अशी मागणी शिंदे यांनी केली आहे.

प्रभाकर शिंदे, भाजप गटनेते

मुंबईत कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने रुग्णालये अपुरी पडत आहेत. रुग्णांवर उपचार करता यावेत म्हणून पालिकेने वरळी, गोरेगाव, बिकेसी(वांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स) येथे कोविड केअर सेंटर उभारली आहेत. जून महिन्याच्या सुरुवातीला मुंबईत चक्रीवादळ येणार, असा इशारा मिळाल्याने बिकेसी येथील कोरोना सेंटर बंद करण्यात आले. तेथील रुग्णांना इतर ठिकाणी हलवण्यात आले. या प्रकारामुळे रुग्णांना त्रास सहन करावा लागल्याचे शिंदे यांनी म्हटले आहे.

बिकेसीमध्ये ज्या ठिकाणी कोविड केअर सेंटर उभारले आहे त्याच्या बाजूलाच मिठी नदी वाहते. याच मिठी नदीने 26 जुलै 2005 मध्ये मुंबईत हाहाकार माजवला होता. मुंबईत पावसाळ्यात दर दिवशी 8 ते 10 इंच पाऊस रोज पडतो. अशा परिस्थितीत पालिका रुग्णांची कशा प्रकारे व्यवस्था करणार आहे, याची माहिती जाहीर करावी. महानगरपालिका आयुक्तांकडे पत्राद्वारे तशी मागणी केली असल्याचे शिंदे यांनी सांगितले.

बिकेसीजवळ बांधण्यात आलेल्या कोविड केअर सेंटरजवळ पालिकेने पाणी उपसण्यासाठी पंप लावले आहेत. याचाच अर्थ याठिकाणी पावसाळ्यात पाणी साचणार आहे. मुंबईत उभारण्यात आलेल्या कोरोना केंद्रांना कोणी परवानगी दिली? या केंद्रांचे आराखडे कोणी मंजूर केले? त्याच्या खर्चाला कोणी परवानगी दिली? याची माहिती आयुक्तांकडून मागवली असल्याचेही शिंदे यांनी सांगितले.

रिक्त इमारती ताब्यात घ्या -

मुंबईत पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असल्याने पाणी साचते. याचा परिणाम कोरोना केअर सेंटरवर होणार आहे. यामुळे रुग्णांनाही त्रास सहन करावा लागेल. मुंबईत अनेक इमारती रिक्त आहेत. या रिक्त इमारतींमध्ये कोविड केअर सेंटर सुरू केल्यास रुग्णांना पावसाचा त्रास होणार नाही. तसेच मुंबईकरांचे पैसेही वाचतील, असे शिंदे यांनी म्हटले आहे.

Last Updated : Jun 9, 2020, 8:13 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details