मुंबई: विधानसभा अध्यक्षपदाची (Assembly Speaker) पहिली लढाई भाजप व शिंदे गटाने जिंकली. भाजप व शिंदे गटाचे उमेदवार राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) 164 मते मिळवत जिंकले. तर, मविआच्या राजन साळवींनी 107 मते मिळाली विधान परिषदत निवडणुकीत शिवसेनेला मतदान करणाऱ्या एमआयएमनेही मविआच्या उमेदवाराकडे पाठ फिरवली. सपा आणि एमआयएमचे मिळून तिघे आमदार तटस्थ राहीले. शिवसेनेचे आमदार आणि बंडखोर शिवसेना आमदारांत सभागृहात वाद होण्याची शक्यता होती पण निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडली.
निवडणुक पद्धतीवर आक्षेप:विधिमंडळ अधिवेशनाचे कामकाज सकाळी 11 वाजता सुरु झाले. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नवनिर्वाचित आमदारांची सभागृहाला ओळख करुन दिली. मतदानासाठी राहुल नार्वेकर यांचा प्रस्ताव भाजपने सादर केला. त्यानंतर आवाजी पद्धतीने मतदान झाले. त्यात नार्वेकर यांना बहुमत मिळाल्याचे चित्र होते. मात्र, आवाजी मतदान पद्धतीलाच मविआने आक्षेप घेतला. त्यामुळे आमदारांची शिरगणती करुन अध्यक्ष निवडला गेला. या प्रक्रियेसाठी विधानसभेच्या सभागृहाचे दरवाजे प्रक्रीया संपेपर्यंत दरवाजे बंद करण्यात आले होते महाविकास आघाडीने सरकारस्थापनेच्या वेळी याच पध्दतीचा अवलंब केला होता. तेव्हा भाजपने त्यावर आक्षेप घेतला होता. या संदर्भात न्यायालयात याचिकाही दाखल आहे. हेच कारण सांगुन राज्यपाल मधल्या काळात नव्या अध्यक्षाच्या निवडीला परवाणगी देत नव्हते मात्र यावेळी पुन्हा त्याच आक्षेपार्ह पध्दतीवर आक्षेप आहे.
शिवसेनेचा व्हीप पाळला नाही : महाविकास आघाडीचे उमेदवार राजन साळवी यांना मतदान करावे, असा व्हीप शिवसेनेने आपल्या आमदारांना बजावला होता. मात्र, शिंदे गटाने शिवसेनेचा व्हीप पाळला नाही. शिवसेनेच्या सर्व बंडखोर आमदारांनी भाजप उमेदवार राहुल नार्वेकर यांना मतदान केले. त्यामुळे राहुल नार्वेकर यांनी बहुमताचा आकडा सहज पार केला. अध्यक्षपदासाठी त्यांना 164 आमदारांनी मतदान केले. समाजवादी पक्षाचे आमदार अबु आझमी व रईस शेख तटस्थ राहिले. एमआयएमचे आमदारही तटस्थ राहिले. त्यांनी मविआ उमेदवाराला मत दिले नाही. त्यामुळे मविआ उमेदवार राजन साळवी यांना 107 मतेच मिळवता आली.
गोगावले यांची ठाकरे गटा बद्दल तक्रार:शिवसेनेचा व्हीप पाळला गेला नाही अशी तक्रार असताना शिंदे गटाकडून प्रतोद भरत गोगावले यांनी व्हीपविरोधात मतदान करणाऱ्या शिवसेनेच्या १६ आमदारांविरोधा तक्रार दाखल केली आहे. शिंदे गटाकडून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना त्या संदर्भात पत्र दिले आहे. अध्यक्षांना लिहिलेल्या पत्रात भरत गोगावले यांचा शिवसेनेचे प्रतोद असा उल्लेख करण्यात आला आहे. विधानसभा अध्यक्षांनी गोगावले यांच्या पत्राचे वाचन केले आणि महाविकास आघाडीच्या आक्षेपा सोबतच गोगावलेचे पत्रही कामकाजात पटलावर आनले.
शिवसेनेकडून शिंदे गटाची तक्रार: विधानसभा अध्यक्षांची निवडवणूक जाहीर होताच विधीमंडळाचे शिवसेनेचे पक्ष प्रतोद सुनील प्रभू यांनी एकनाथ शिंदे यांच्यासह सर्व आमदारांना व्हीप जारी केला होता. महाविकास आघाडीचे उमेदवार राजन साळवी यांनाच सर्वांनी मतदान करावे, असा व्हीप आमदारांना देण्यात आला होता. व्हीप जारी केल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आक्रमक झाले. आमच्याकडे बहुमत असल्याने सुनील प्रभू यांनी जारी केलेला व्हीप आम्हाला लागू होत नाही, अशी प्रतिक्रिया शिंदे यांनी दिली मात्र कोणाचा व्हीप खरा हा कळीचा मुद्दा म्हणुन समोर आला.