मुंबई -छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ चालवण्याचे मालकी अधिकार अदानी समूहाला मिळाले आहेत. याचा अर्थ असा नाही की, अदानी समूहाला विमानतळाचे नाव बदलण्याचे अधिकार मिळाले. 'अदानी एअरपोर्ट' हे नाव आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या परिसरात लावणे हे अदानी समूहाची चूक आहे, असे खडे बोल राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी सुनावले आहेत.
सोमवारी (दि. 2 ऑगस्ट) मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयात प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना नवाब मलिक यांनी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नाव बदलण्याच्या मुद्द्यावर अदानी समूहावर टीका केली.
लोकभावना दुखावल्याने तोडफोडीची घटना
अदानी समूहाने अदानी एअरपोर्ट, असे नामफलक लावल्यामुळे लोकांच्या भावना दुखावल्या आहेत. या भावना दुखावल्यामुळेच नाम फलक तोडण्याची घटना घडल्याचे नवाब मलिक यांनी सांगितले. अदानी समूहाकडे मालकीहक्क जाण्यापूर्वी जीव्हीके या कंपनीकडे आंतरराष्ट्रीय विमानतळ चालवण्याचे मालकी हक्क होते. जीव्हीके कंपनीचे भाग अदानी समूहाने खरेदी केल्यानंतर मुंबईतील अंतरराष्ट्रीय विमानतळ चालवण्याचे मालकी हक्क आणि समूहाकडे आले आहेत. मात्र, आदानी समूहाला छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ हे नाव बदलण्याचे अधिकार मिळाली नसल्याचे नवाब मलिकांनी सांगितले. तसेच राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांच्या मान्यतेनुसार मुंबई विमानतळाला छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ हे नाव देण्यात आल्याचे त्यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे.