मुंबई- माहीम परिसरातून फुटपाथवर झोपलेल्या एका महिलेचे 2 महिन्यांचे बाळ चोरून ते 25 हजार रुपयांना विकण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या आरोपीला दादर जीआरपी पोलिसांनी अवघ्या तासाभरात दादर रेल्वेस्थानकातून अटक केली आहे. तसेच ते बाळ सुखरूप त्याच्या आईकडे सोपवले आहे. 26 जूनच्या पहाटेची ही घटना आहे. शहाबाज बक्षी शेख (26) असे त्या आरोपीचे नाव आहे.
माहीम रेल्वे स्थानकाच्या बाहेर फुटपाथवर मधू अर्जुन परमार (30) ही महिला तिची दोन जुळी मूले चंदू व गणेश यांच्यासह झोपली होती. अचानक जाग आल्यावर मधूला तिच्या दोन मुलांपैकी चंदू हा गायब असल्याचे लक्षात आले. घाबरलेल्या मधूने माहीम पोलीस ठाण्यात बाळ हरवल्याची तक्रार दाखल केली. तक्रार दाखल केल्यानंतर पीडित महिला दादर रेल्वेस्थानकात आल्यावर तिने दादर रेल्वे पोलिसांना याबद्दल माहिती दिली. घटना जरी माहीम पोलिसांच्या हद्दीत घडली असली तरी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून दादर जीआरपी पोलिसांनी तत्काळ पहाटे 3 वाजता दोन टीम बनवून बाळाचा शोध घेतला असता, दादर रेल्वे स्थानकावरील मध्य व पश्चिम दिशेला जोडणाऱ्या स्काय वॉकखाली एक व्यक्ती बाळासह आढळून आला.