मुंबई - Mumbai Culture Festival 2024 : इंडियन हेरिटेज सोसायटीच्या वतीने प्रतिष्ठित मुंबई संस्कृती महोत्सवाची 32 वी आवृत्ती 13 आणि 14 जानेवारी 2024 रोजी पार पडणार आहे. हा सोहळा मुंबईतील फोर्टमध्ये आयकॉनिक टाऊन हॉल (एशियाटिक लायब्ररी) येथे होईल. दिग्गजांचा सहभाग असलेल्या या महोत्सवाची सुरुवात १३ जानेवारी (शनिवार) रोजी प्रसिद्ध बासरीवादक राकेश चौरसिया (बासरीवादक पंडित हरिप्रसाद चौरसिया यांचे पुतणे) यांच्या 'कन्फ्ल्यूएन्स - मयूझिक फॉर पीस अँड हार्मोनी'ने होईल. दुसर्या दिवशी म्हणजे १४ जानेवारी (रविवार) विदुषी अश्विनी भिडे देशपांडे (जयपूर-अत्रौली घराण्यातील हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताचाच्या प्रवर्तक) आणि पंडित संजीव अभ्यंकर (मेवाती घराण्याचे हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत गायक) यांच्या 'भक्ती संगम' या कार्यक्माचे आयोजन करण्यात आले आहे.
'मुंबई संस्कृती' या कार्यक्रमाचे मूळ 1992 मध्ये सापडते. इंडियन हेरिटेज सोसायटीची सुरुवात अनिता गरवारे यांच्या नेतृत्वात 1991 मध्ये झाली. आताचा ऐतिहासिक परिसर - बाणगंगा तलाव जतन करण्यासाठी, बाणगंगा महोत्सवाची सुरुवात झाली. "सर्व मुंबईकर नागरिकांनी बाणगंगा टँकबद्दल ऐकलेले असले तरी, फार कमी लोकांना त्याचे स्थान, इतिहास आणि महत्त्व माहित होते आणि त्यासाठी लाइव्ह म्युझिक हा जागरूकता वाढवण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे, असे आम्हाला वाटले." , असे अनिता गरवारे म्हणाल्या. इंडियन हेरिटेज सोसायटीने बाणगंगा महोत्सव म्हणून सुरुवात केलेल्या या उत्सवाचे त्यातील स्थापत्य आणि सांस्कृतिक वारसा एकत्र करून व्यापक मान्यताप्राप्त अशा मुंबई संस्कृती महोत्सवात रुपांतर झाले आहे.
“शहरातील हेरिटेज लँडमार्क संरचनांचे पुनरुज्जीवन करण्यात ही सोसायटी महत्त्वाची भूमिका बजावते. संगीताच्या माध्यमातून मुंबईच्या इतिहासाची आणि संस्कृतीची सतत जाणीव वाढवण्यास आयएचएस वचनबद्ध आहे. ही हेरिटेज सोसायटी आपल्याला समृद्ध वारसा म्हणून मिळालेल्या गोष्टींबद्दल जागरुकता निर्माण करण्याचा प्रयत्न करते आणि त्याचे संवर्धन, जीर्णोद्धार आणि भविष्यातील पिढ्यांपर्यंत प्रसारित करण्यासाठी सक्रियपणे कार्य करते,” असेही अनिता गरवारे यांनी सांगितले.
आजच्या वेगवान जगात शास्त्रीय संगीताच्या कौतुकाची आव्हाने स्वीकारून, इंडियन हेरिटेज सोसायटीची टीम सक्रियपणे प्रेक्षक वर्गाचा विस्तार करण्यात गुंतलेली आहे. महाविद्यालये, संगीत शाळा आणि शैक्षणिक संस्थांपर्यंत पोहोचणे, सोशल मीडियाचा फायदा घेणे आणि मुंबई संस्कृती महोत्सवात मोफत प्रवेश देऊन अधिक समावेशक सांस्कृतिक अनुभव सुनिश्चित करणे अशा अनेक प्रयत्नांचा यात समावेश आहे.