मुंबई : महाविकास आघाडी शिंदे फडणीस सरकारच्या विरोधात जनतेमध्ये जाऊन रान उठवणार असून यासाठी जून महिन्यापर्यंत महाविकास आघाडीच्या ज्येष्ठ नेत्यांच्या सात सभेचे आयोजन करण्यात आल आहे. या सभेच्या आयोजनासाठी आज महाविकास आघाडीच्या नेत्यांची मुंबई येथे वाय. बी. चव्हाण सेंटर येथे बैठक पार पडली असून या बैठकीत तीनही पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांनी तिन्ही पक्षांच्या राज्यभरातील स्थानिक नेत्यांना मार्गदर्शन केलं.
उद्धव ठाकरे यांची शिंदे सरकारवर टीका :यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही भाषण करतेवेळी शिंदे फडणवीस सरकार आणि भारतीय जनता पक्षावर हल्ला चढवला. 'भारतीय जनता पक्षात सामील व्हा नाहीतर तुरुंगत जा' अशी परिस्थिती सध्या देशभरात आहे. नेहमीच महाराष्ट्राने देशाला दिशा दाखवण्याचं काम केलं आहे. त्यामुळे सध्या देशात असलेल्या या परिस्थितीत पुन्हा एकदा महाराष्ट्राने देशाला दिशा दाखवेल अशी आशा आहे.
2024 देशातील शेवटची निवडणूक :राज्यात महाविकास आघाडी सरकार असताना मुख्यमंत्री म्हणून काम करताना आपल्यावर आरोप केले गेले. घरी बसून सरकार चालवले. पण जे आपण घरी बसून केलं ते सुरत गुहाटीला जाऊन करू शकले नाहीत. आताची लढाई केवळ महाराष्ट्राचे नाही. सत्ता स्थापनेसाठी आपण एकत्र आलेलो नाही. सत्ता तर स्थापन करायची आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुका या देशात लोकशाही टिकेल का नाही ? यासाठी होणार आहेत. ही निवडणूक देशातील शेवटची निवडणूक असेल. त्यामुळे यावेळची निवडणूक तिन्ही पक्षाच्या नेत्यांनी कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून गावागावात पोहोचून लढावी लागेल. सत्ता स्थापन का करायची याचे उदाहरण आपण लोकांना द्यायचा आहे, अस आवाहन उद्धव ठाकरे यांनी यावेळी कार्यकर्त्यांना केले.
सर्वोच्च न्यायालय आशेचा किरण :लोकशाहीसाठी चार स्तंभ महत्त्वाचे असतात, मात्र या चार स्तंभा पैकी तीन स्तंभाची विल्हेवाट कधीच लावण्यात आली आहे. मात्र सर्वोच्च न्यायालय हा एक शेवटचा आशेचा किरण आहे. सध्या सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणी बाबत आपण आता काही बोलणार नाही. मात्र, न्यायदेवतेच्या डोळ्यावर पट्टी जरी, असली तरी आपल्या देशात लोकशाहीचे वस्त्रहरण न्यायदेवता होऊ देणार नाही, अशी आशाही उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली.