ठाणे Thane Murder : 'लिव्ह इन' रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या ३८ वर्षीय विवाहित प्रेयसीच्या चारित्र्यावर संशय घेत प्रियकराने तिची चाकूनं वार करून राहत्या घरातच निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आलीय. ही घटना कल्याण पूर्व विजयनगर आमराई परिसरात असलेल्या एका चाळीच्या घरात घडलीय. याप्रकरणी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात प्रियकरावर हत्येचा गुन्हा दाखल करत पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या आहेत. विजय जाधव (वय ४८) असं पोलिसांनी अटक केलेल्या आरोपी प्रियकराचं नाव आहे.
चारित्र्याच्या संशयावरून वाद : याप्रकरणी पोलीसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार मृत 38 वर्षीय विवाहिता ही पतीपासून विभक्त राहत होती. त्यातच गेल्या काही महिन्यापासुन रिक्षाचालक असलेल्या आरोपी विजय याच्याशी अनैतिक संबंध सुरु झाले. तेव्हापासून हे दोघंही कल्याण पूर्वेतील विजयनगर भागातील आमराई येथील एका चाळीच्या खोलीत 'लिव्ह इन' रिलेशनशिपमध्ये राहत होते. अशातच गेल्या काही दिवसांपासून आरोपी विजयला मृतक रसिकाच्या चारित्र्यावर संशय होता. त्यामुळंच वारंवार त्या दोघांमध्ये वाद होत होते. याच वादातून विजयनं राहत्या घरातच तिच्यावर चाकूनं हल्ला करत तिची हत्या केली. या घटनेची माहिती कोळशेवाडी पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करत तिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात रवाना करून आरोपी प्रियकराला ताब्यात घेतलंय.