मुंबई : जुनी पेन्शन लागू होण्यासाठी आता शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कंबर कसलेली आहे. राज्यातील 50,000 पेक्षा अधिक शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी उद्यापासून जोरदार थाळी नाद आंदोलन करणार आहेत. प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी हे आंदोलन केले जाणार आहे. उद्यापासून राज्याच्या संपकऱ्यांना जोरदार पाठिंबा देण्यासाठी शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी मैदानात उतरणार आहेत. दहावी बारावीच्या परीक्षांचे उत्तरपत्रिका तपासण्याचे काम ठप्प झालेले आहे. आता शाळा देखील ओस पडू लागलेल्या आहेत. त्यामुळे शिक्षण विभाग देखील आता संपाच्या फेऱ्यात आला आहे.
जुनी पेन्शन योजनेची मागणी : राज्यातील 2005 यावर्षीपासून शासकीय कर्मचारी निमशासकीय कर्मचारी यांना पेन्शन लागू होत नाही त्यावेळच्या शासनाने ही पेन्शन योजना बंद केली .त्याच्यानंतर अनेक वर्षे त्याबाबत आंदोलन देखील झाले. परंतु आता महाराष्ट्रातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी तसेच राज्य शासनाचे शासकीय कर्मचारी आणि निमशासकीय कर्मचारी या सगळ्यांनी एकत्रित संयुक्त लढा देण्याचा ठरवलेलं असल्यामुळे राज्यभरात जोरदार संप आंदोलन सुरू आहे.
शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी सहभागी : राज्यव्यापी संप आंदोलनामुळे राज्यातील आरोग्य विभाग महसूल, कृषी , ग्रामविकास आणि पाणीपुरवठा तसेच शिक्षण विभाग यामधील सर्व सेवा ठप्प झालेल्या आहेत. त्यापैकी आरोग्य विभागाच्या सेवा पूर्णपणे कोलमडलेल्या आहेत. या सर्व परिस्थितीला पाहून शासनाने संप मिटावा यासाठी संपकऱ्यांना संप मिटवण्यासाठी आवाहन केलेले आहे. परंतु जुनी पेन्शन याबाबत शासन निर्णय करत नाही. आणि नवीन एक समिती जाहीर करते. याबाबत 19 लाख संपकऱ्यांमध्ये मोठा असंतोष आहे. या लाखो कर्मचाऱ्यांमध्ये चार लाख शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी देखील पूर्णपणे सहभागी झालेले आहेत.