मुंबई : संपूर्ण देशात पंतप्रधान मोदी नावाचे गारूड निर्माण केले जात आहे. महाराष्ट्रातही आगामी निवडणुकीत मोदींचा चेहरा वापरला जाणार आहे. या पार्श्वभूमीवर गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दौरा मुंबईत येत आहे. निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून हा दौरा होत असला तरी, त्यांना रोखण्यासाठी महाविकास आघाडीने नवी रणनीती आखली आहे. त्यानुसार मोदी अस्त्र रोखण्याची जबाबदारी थेट शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंकडे सोपवण्यात आल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.
महाविकास आघाडीकडून मोट बांधणी सुरू :भाजपने आगामी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत विजयाच्या हॅट्ट्रिकसाठी आपली तयारी केली आहे. महाराष्ट्रात ४५ जागांचे उद्दिष्ट्य ठेवले आहे. त्यानुसार २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीत पक्षाने गमावलेल्या जागांवर अधिक लक्ष्य केंद्रित केले आहे. तर विधानसभेसाठी २०० जागांची तयारी ठेवली आहे. शिवसेनेतून बाहेर पडलेल्या शिंदे गटाच्या आमदार, खासदारांच्या मतदारसंघावर भाजपने विशेष फोकस केले आहे. महाविकास आघाडी विरोधात भाजपने रणशिंग फुंकले आहे. तर २०२४ च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत भाजपला रोखण्यासाठी महाविकास आघाडीकडून मोट बांधणी सुरू केली आहे.
आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांसाठी पक्षांकडून मोर्चेबांधणी सुरूआगामी लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकांसाठी राजकीय पक्षांकडून मोर्चेबांधणी सुरु झाली आहे. महाविकास आघाडीने २०१९ नंतर भाजपला सत्तेपासून दूर ठेवले. येत्या निवडणुकीत हीच रणनीती वापरली जाणार आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंकडे याची मुख्य भूमिका सोपवली आहे. महाविकास आघाडी सरकार असताना मुख्यमंत्री म्हणून नेतृत्व करताना उद्धव ठाकरे यांनी प्रभावी कामगिरी केली. ठाकरेंवर आघाडीतील नेत्यांचा दांडगा विश्वास आहे. शिवाय, विरोधकांनाही कोणताही धोका जाणवत नसल्याने एकमताने हा निर्णय घेण्यात आल्याचे समजते. त्यानुसार सर्व प्रादेशिक विरोधी पक्षांना एकत्र आणण्याचे काम ठाकरेंकडे असणार आहे. आता मोदींना ठाकरे रोखणार का, हे पाहणे महत्त्वाचे आहे.