मुंबई :मुंब्रातील शिवसेना शाखेचा वाद ताजा असताना गुरुवारी दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनाच्या पूर्व संध्येला शिवसेना (शिंदे गट) तसंच शिवसेना (ठाकरे गटाचे) कार्यकर्ते आमने सामने आले. दोन्हीकडून शक्ती प्रदर्शन करत एकामेकाविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. पोलिसांनी मध्यस्थी करत वादावर पडदा टाकला. मात्र, अचानक उडालेल्या गोंधळामुळं काही काळ तणावाचं वातावरण होतं. यावेळी दोन्ही गटाकडून एकमेकांना धक्काबुक्की करण्यात आल्याची घटना देखील घडली आहे.
दोन्ही गट आमने-सामने :बाळासाहेब ठाकरे यांच्या दादर शिवाजी पार्क येथील स्मृतीस्थळावर शिवसेना शिंदे गटानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली श्रद्धांजलीचा कार्यक्रम आयोजित केला होता. मुख्यमंत्री शिंदे यांनी रात्री साडेआठ वाजता शिवतीर्थावर बाळासाहेबांना अभिवादन केलं. आमदार, खासदार, पदाधिकारी, कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. शिंदे गेल्यानंतर शिवसेना ठाकरे गटाचे सचिव अनिल देसाई, अनिल परब यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या संख्येनं शिवसैनिक शिवतीर्थ दाखल झाले. यावेळी शिंदे गटाचे कार्यकर्ते देखील स्मृतीस्थळावर हजर होते. त्यामुळं ठाकरे गटानं आक्रमक होत जोरदार घोषणाबाजी केली. अचानक दोन्ही गट आमने-सामने आल्यानं मोठा गदारोळ झाला.
उद्या बाळासाहेबांचा स्मृतीदिन : शिवसैनिकांसाठी बाळासाहेबांच्या स्मृती दिनाचा महत्त्वाचा दिवस आहे. मराठी माणूस, महाराष्ट्र तसंच देशासाठी ज्यांनी संपूर्ण आयुष्य वेचले त्यांचा उद्या स्मृतीदिन आहे. त्यांना आम्ही शांततेनं श्रद्धांजली वाहण्यासाठी आलो आहे. बाकीचे तमाशे करण्याच्या प्रयत्नात आहेत. कुणीही इथं विघ्न आणण्याचा प्रयत्न केला, तर आम्ही विघ्न येऊ देणार नाहीत, अशी भूमिका अनिल देसाई यांनी मांडली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे नेतृत्व माहिती आहे. ज्यांना दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे संस्कार माहिती आहेत, ते कुणीही इथं अनर्थ करणार नाहीत, असं देसाई म्हणाले.