मुंबई : राज्यात शिंदे- फडणवीस- अजित पवार अशी महायुती झाली असताना आगामी लोकसभा निवडणुकीसाठी कंबर कसा व त्यादृष्टीने (Uddhav Thackeray on Loksabha Election) तयारीला लागा, असे निर्देश ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना दिला आहे. विशेष करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र कल्याण डोंबिवली लोकसभा मतदार संघाचे खासदार श्रीकांत शिंदे यांचा पराभव करण्यासाठी उद्धव ठाकरे गटाने कंबर कसली आहे. बोरिवली, कल्याण डोंबिवली लोकसभा मतदार संघातील पदाधिकाऱ्यांची बैठक आज मातोश्रीवर आयोजित करण्यात आली होती.
काय म्हणाले उद्धव ठाकरे :सर्व विधानसभा संपर्क प्रमुख यांनी आतापासून कामाला लागावे. जे बूथ प्रमुख आहेत त्यांनासुद्धा सक्रिय करून त्यांच्याकडून कामे करून घ्या. आपापल्या मतदारसंघात लोकांची कामे करा, सतत त्यांच्या संपर्कात राहा अशा सूचनासुद्धा उद्धव ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना याप्रसंगी दिल्या. तसेच मतदार यादीत ज्यांची नावे वगळली गेली आहेत, त्या सर्वांशी संपर्क साधून त्यांच्या अडचणी समजून घ्या. नक्की काय अडचण आहे ती समजून त्यांना मदत करा व त्यांची नावे मतदार यादीत नोंदवा. कारण केव्हाही निवडणूका लागू शकतात. म्हणून आपण पूर्णपणे तयार असायला हवे, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.