मुंबई :उपमुख्यमंत्री अजित पवारयांनीशरद पवार यांना ऑफर दिल्याच्या चर्चेवर खासदार संजय राऊत यांनी त्यांंची प्रतिक्रिया दिली आहे. पवार कुटुंब हे मोठे कुटुंब आहे, या संदर्भात आपण फार बोलणार नाही. महाविकास आघाडी भक्कम आहे आणि ती भक्कमपणे उभी आहे. राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेना हे पक्ष एकत्र आहेत. भविष्यातही ते एकत्र राहतील. तसेच 'इंडिया' आघाडीच्या बैठकीतही एकोपा राहील, असे त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
या सगळ्या अफवा :विधानसभेचेविरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मोठा दावा केला आहे. 'शरद पवारांना सोबत आणाल, तरच मुख्यमंत्री पद मिळेल' अशी अट भाजपाकडून अजित पवार यांना घालण्यात आली आहे. शरद पवार सोबत आल्यास अजित पवार मुख्यमंत्री होणार आहेत. त्यामुळे वारंवार उपमुख्यमंत्री अजित पवार हे शरद पवार यांची भेट घेत आहे. यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आपली प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की, या सगळ्या अफवा आहेत. शरद पवार हे महाविकास आघाडीचे मोठे नेते आहेत. ते आमचे मार्गदर्शक आहेत.
शरद पवार महाराष्ट्राच्या दौऱ्यावर :अजित पवार हे इतके मोठे नेते नाही की, ते शरद पवारांना 'ऑफर' देऊ शकतात. या संदर्भात रात्रीच आमच्यात फोनद्वारे चर्चा झाली आहे. शरद पवार हे सध्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहे. आम्ही महाविकास आघाडीतील घटक पक्ष एकत्र आहोत आणि एकत्र राहू. शरद पवार हे अजित पवारांसोबत हात मिळवणी करणार नाही, असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे.
2024 मध्ये इंडिया आघाडीचे पंतप्रधान : सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, त्यामध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लाल किल्ल्यावर ध्वजारोहण संपन्न झाले. मात्र ध्वजारोहण केल्यानंतर तो ध्वज फडकलाच नाही. यावर संजय राऊत यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. ध्वज न फडकणे, हे एक शुभ संकेत म्हणता येईल. येणाऱ्या 2024 मध्ये इंडिया आघाडीचे पंतप्रधानच लाल किल्ल्यावरून 'ध्वजारोहण' करतील, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.