दिपक केसरकर यांची प्रतिक्रिया मुंबई :शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून मुंबई महानगरपालिकेवर १ जुलै रोजी विराट मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या मोर्चासाठी ठाकरे गटाकडून जोरदार तयारी करण्यात आली असून या मोर्चाचा टिझरही प्रकाशित करण्यात आला आहे. मात्र सूत्रांच्या माहितीनुसार मुंबई पोलिसांनी या मोर्चाच्या मार्गात पोलिसांनी बदल केला आहे.
मोर्चाच्या मार्गात बदल : मेट्रो सिनेमा ते आझाद मैदान असा मोर्चा आता काढण्यात येणार आहे. पोलिसांसोबत झालेल्या बैठकीत हा तोडगा काढण्यात आला आहे. पोलीस प्रशासन तसेच ठाकरे गट यांच्यात आज बैठक झाली. त्यावेळी हा निर्णय घेण्यात आला. सुरुवातीला ठाकरे गटाने मेट्रो सिनेमापासून महापालिकेच्या बाजूच्या टाइम्स ऑफ इंडिया इमारतीपर्यंत मोर्चा काढण्याची परवानगी मागितली होती. मात्र कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांनी या मोर्चाला परवानगी नाकारली होती.
भ्रष्टाचारा विरोधात मोर्चा :राज्यात असलेले शिंदे-फडणवीस सरकार हे बेकायदेशीर असून सरकारला जाब विचारणारे कोणीच नाही आहे. राज्यातील बेकायदेशीर सरकार हे निवडणुका घ्यायला सुद्धा बघत नाही. जनतेच्या पैशाची उधळपट्टी चालली आहे. महापालिकेतील भ्रष्टाचाराबाबत आवाज उठल्यावर त्यांच्यावर ईडी, सीबीआयकडून कारवाई होत आहे. या सर्व मुद्द्यांवर शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वात १ जुलै रोजी मुंबई महापालिकेवर विराट मोर्चा काढण्यात येणार आहे.
पालिका आयुक्तांवर निशाणा :वास्तविक शनिवार हा सुट्टीचा दिवस असल्याने हा मोर्चा काढून मोर्चेकरी कोणाला भेटणार? किंवा कोणाला निवेदन देणार? हा सुद्धा प्रश्न होता. परंतु या प्रश्नाचे उत्तर काही दिवसांपूर्वी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीच दिले होते. त्यांनी सांगितले होते की, मोर्चा आम्ही काढणार आहोत, पण आम्ही कोणालाही निवेदन देणार नाहीत. कारण निवेदन घेणारे हे त्यांच्या टेबलाखाली बसले आहेत, असे सांगून उद्धव ठाकरे यांनी अप्रत्यक्षपणे पालिका आयुक्त, इकबाल सिंह चहल यांच्यावर निशाणा साधला होता. या कारणावरून सुद्धा या मोर्चा बाबत सरकारमध्ये नाराजगी होतीच. यावर बोलताना विधानसभेतील ठाकरे गटाचे गटनेते, आमदार, अजय चौधरी म्हणाले आहेत की, जनतेच्या भावना आक्रोश महाराष्ट्राला समजण्यासाठी आम्ही हा मोर्चा काढणार आहोत. महापालिकेतील भ्रष्टाचाराबाबत आदित्य ठाकरे यांनी आयुक्तांना अनेक पत्र लिहिली. परंतु एकाही पत्राचे उत्तर आयुक्तांनी दिलेले नाही.
आदित्य ठाकरे कॉन्ट्रॅक्टरचे प्रतिनिधी : कायदा सुव्यवस्था राखणे पोलिसांचं काम मोर्चाला परवानगी नाकारली यावर बोलताना शिंदे गटाचे प्रवक्ते, मंत्री, दीपक केसरकर म्हणाले आहेत की, शेवटी हा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न आहे. पोलिसांनी परवानगी नाकारली असेल तर, नक्कीच त्याच्यामध्ये काहीतरी तथ्य असेल. तो त्यांचा विषय आहे. परंतु वांद्रे येथील शिवसेनेची शाखा तोडण्यात आली ती अनधिकृतच होती. परंतु त्याबाबत एखाद्या अधिकाऱ्याला मारहाण करणे हे सुद्धा चुकीचे आहे. तुम्ही किती झाला तरी कायदा सुव्यवस्था आपल्या हाती घेऊ शकत नाहीत. आदित्य ठाकरे हे कॉन्ट्रॅक्टरचे प्रतिनिधी म्हणून काम करत आहेत. आदित्य यांनी ते डोक्यातून काढायला पाहिजे. शेवटी कायदा सुव्यवस्था राखणे पोलिसांचे काम आहे, मला त्यात पडायचं नाही, असेही केसरकर म्हणाले आहेत.