मुंबई :'लोक माझे सांगाती' या शरद पवारांच्या आत्मचरित्राच्या दुसऱ्या आवृत्तीचे यशवंतराव चव्हाण सेंटर येथे मंगळवारी प्रकाशन झाले. या कार्यक्रमात पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदावरून पायउतार होण्याची घोषणा केली. पवारांच्या या घोषणेनंतर राजकीय वातावरण ढवळून निघाले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांचे, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी भावनिक होत, पवार यांनी निर्णय मागे घ्यावा, यासाठी घेराव घातला. परंतु, तीन दिवसांची वेळ मागत कार्यकर्त्यांच्या गराड्यातून सुटका करून घेतली. गेल्या दोन दिवसांपासून पवार यांच्या अध्यक्ष पदाची चर्चा रंगली आहे. मात्र, आता लोक माझे सांगातीमध्ये महाविकास आघाडी स्थापन करण्यापासून उद्धव ठाकरेंच्या कार्यपद्धतीवर भाष्य करण्यात आले आहे. त्याचबरोबर या पुस्तकातील विविध मुद्दे आता प्रकाश झोतात येत आहेत.
मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा डाव : महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने मुंबईत झालेल्या महाविकास आघाडीच्या वज्रमुठ सभेत उद्धव ठाकरे यांनी धडाकेबाज भाषण केले. मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा डाव आखला जातोय, असा आरोप करत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपची आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोंडी करायचा प्रयत्न केला. शिवसेना हा आरोप सातत्याने करत आली आहे. शरद पवार यांनी मात्र या आरोपांवर लोक माझा सांगती या पुस्तकातून आरसा दाखवला आहे.
शिवसेनेच्या कट्टर हिंदुत्ववादावर टीकास्त्र : 'मुंबई केंद्रशासित होण्याच्या चर्चेला पूर्णविराम मिळायला हवा. मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करावी, असे दिल्लीतील कोणत्याही पक्षाच्या नेत्याच्या मनात नाही, हे मी जबाबदारीने सांगू इच्छितो', असे शरद पवार यांनी पुस्तकातील पृष्ठ क्रमांक ४१७ नमूद केले आहे. तर हाच पुस्तकातील ३१८व्या पानावर पवार यांनी शिवसेनेच्या कट्टर हिंदुत्ववादावर टीकास्त्र सोडले आहे. भाजपला सत्तेपासून महाविकास आघाडी बनवताना शिवसेनेचा कट्टर हिंदुत्ववाद मारक ठरेल, अशी भीती काहींना होती. परंतु हा पक्ष वेळोवेळी कितीही जोरकसपणे भूमिका मांडो, त्यांचा वैचारिक पाया तितका भक्कम नाही, असे शिवसेनेच्या बाबतीत माझे विचार असल्याचे पवार म्हणाले आहेत.
शिवसेनेचा वैचारिक पाया : शिवसेनेने इंदिरा गांधी यांना आणीबाणीमध्ये दिलेल्या पाठिंब्याची तसेच त्यानंतरच्या निवडणुकीत पाठिंबा देऊन विधान परिषदेतील दोन आमदारपदे मिळवली होती. एकंदरीत शिवसेनेच्या पूर्वेतिहासावर नजर टाकली तर राजकारणासाठी लागणारी लवचिकता त्यांनी वारंवार दाखविली आहे. 'मुस्लिम व दलित विरोध हा शिवसेनेच्या भूमिकेतील एक पैलू झाला. परंतु तो दिसतो तेवढा टोकाचा नाही', असे आमचे निरीक्षण होते', असेही शरद पवार यांनी पुस्तकात नमूद केले आहे.
हेही वाचा : Sharad Pawar resignation: शरद पवारांनी राजीनामा मागे घ्यावा, राहुल गांधींसह दोन राज्याच्या मुख्यमंत्र्यांचे सुप्रिया सुळेंना फोन