मुंबई - रेल्वे कर्मचारी कर्तव्यावर असताना सतर्कता, अनुचित घटना टाळण्यात आणि रेल्वे सुरक्षितता चालविण्यास महत्त्वाची जबाबदारी बजाविणाऱ्या कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यात ( Railway Worker honoured ) आला. मध्य रेल्वेच्या मुंबई, नागपूर, पुणे, सोलापूर आणि भुसावळ विभागातील प्रत्येकी दोन कर्मचाऱ्यांना 'महाव्यवस्थापक सुरक्षा पुरस्कार' प्रदान केला. सीएसएमटी येथे आयोजित कार्यक्रमात प्रसंगावधान दाखवून योग्य कामगिरी करणाऱ्याला पुरस्कार प्रदान करण्यात आला. या पुरस्कारामध्ये पदक, प्रशंसा प्रमाणपत्र, अनुकरणीय सुरक्षा कार्याचे प्रशस्तिपत्रक आणि रोख 2 हजार रुपये देण्यात आले. यावेळी मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक यांनी सांगितले की, पुरस्कार विजेत्यांनी प्रशंसनीय काम केले आहे. सुरक्षित कामासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांनी दाखवलेली 24x7 इतरांना प्रवाशांच्या सुरक्षेसाठी प्रामाणिकपणे काम करण्यास प्रेरणा देणार आहे.
हेड काॅन्स्टेबल प्रमोद डेणे -
मुंबई विभागातील हेड काॅन्स्टेबल प्रमोद डेणे यांनी 26 नोव्हेंबर 2021 रोजी गाडी क्रमांक 11020मध्ये एस्कॉर्ट ड्युटी करत असताना त्यांना मध्यरात्री जळण्याचा वास आला. जळण्याच्या जागेचा शोध घेतला असता इंजिनच्या शेजारी असलेल्या कोचच्या चाकातून धूर निघत असल्याचे त्यांना आढळले. त्यांनी ताबडतोब अलार्म चेन ओढून ट्रेन थांबवली आणि आग विझवण्यात मदत केली. त्यामुळे एक अनुचित घटना टळली. मुंबई विभागातील वाडी बंदर येथील फिटर-I समय सिंग मीना यांनी 20 जानेवारी रोजी पंजाब मेलच्या अंडरगियरच्या तपासणी करताना आढळून आले की, सेकंडरी सेकंडरी सस्पेंशनच्या वरच्या आणि खालच्या कॉइल तुटलेल्या आहेत. त्यानंतर त्वरित कोच उपयोगास अयोग्य असल्याचे चिन्हांकित केले आणि त्यामुळे एक संभाव्य अपघात टळला.
गार्ड प्रफुल्ल कुमार -
भुसावळ विभागातील गार्ड प्रफुल्ल कुमार यांनी 23 जानेवारी 2022 रोजी मालगाडीवर काम करत असताना बुरहानपूर-वाघोडा सेक्शनवर किमी 489/13-11 वर एक रेल फ्रॅक्चर पाहिला. याची माहिती त्यांनी तत्काळ स्टेशन मॅनेजर, वाघोडा यांना दिली. त्यांच्या कर्तव्याप्रती अत्यंत सतर्कता आणि दक्षतेमुळे होणारी अनुचित घटना टळली.
लोको पायलट मेल डी.डी. कोल्हे -
भुसावळ विभागातील लोको पायलट मेल डी.डी. कोल्हे यांनी 25 जानेवारी 2022 रोजी गाडी क्रमांक 12618 मंगला एक्स्प्रेसवर कार्यरत असताना नांदगाव-पांजण विभागादरम्यान झटका जाणवला. ग्रीन सिग्नल असतानाही त्यांनी ट्रेन थांबवली आणि स्टेशन मॅनेजरला याची माहिती दिली. अभियांत्रिकी विभागाने तपासणी केली असता, रेल फ्रॅक्चर असल्याचे निदर्शनास आले. त्यांनी वेळीच केलेल्या कारवाईमुळे पुढील ट्रेनमध्ये होणारी अनुचित घटना टाळता आली.
ट्रॅक मेंटेनग शिवपाल कन्हैया -
नागपूर विभागातील ट्रॅक मेंटेनग शिवपाल कन्हैया यांनी 13 जानेवारी 2022 रोजी गेटमन कर्तव्यावर काम करत असताना तेथून जाणाऱ्या मालगाडीच्या चौथ्या वॅगनमध्ये हाॅट एक्सेल असल्याचे आढळून आले. त्वरीत कारवाई करत ट्रेन थांबवण्याचा प्रयत्न केला आणि स्टेशन मॅनेजर मुलताई यांना कळविले आणि त्यामुळे संभाव्य अपघात टळला.