अस्थायी सहाय्यक प्राध्यापक डॉक्टरांचे काम बंद आंदोलन, सेवेत नियमित करण्याची मागणी - doctors agitation for various demands news
राज्यातील 19 शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील अस्थायी सहाय्यक प्राध्यापक डॉक्टरांनी दोन दिवसीय काम बंद आंदोलन सुरू केले आहे. आपल्याला कायमस्वरूपी सेवेत सामावून घ्यावे आणि सातवा वेतन आयोग लागू करावा, या मागण्यासाठी हे आंदोलन पुकारण्यात आले.

मुंबई - राज्यातील 19 शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील अस्थायी सहाय्यक प्राध्यापक डॉक्टरांनी दोन दिवसीय काम बंद आंदोलन सुरू केले आहे. आपल्याला कायमस्वरूपी सेवेत सामावून घ्यावे आणि सातवा वेतन आयोग लागू करावा, या मागण्यासाठी हे आंदोलन पुकारण्यात आले. त्यानुसार मुंबईतील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जे. जे. रुग्णालय येथे आज सकाळी सहाय्यक प्राध्यापक डॉक्टरांनी काम बंद करत घोषणाबाजी केली. तर राज्यातील सर्व 19 वैद्यकीय महाविद्यालयांत असे आंदोलन सुरू आहे.
डॉक्टरांच्या कराराचे दर चार महिन्यांनी होते नूतनीकरण -
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात काही प्राध्यापक डॉक्टरांची नियुक्ती अस्थायी स्वरुपात केली जाते. दर चार महिन्यांनी कराराचे नूतनीकरण केले जाते. अशाप्रकारे गेल्या कित्येक वर्षांपासून हे डॉक्टर प्राध्यापक 19 वैद्यकीय महाविद्यालयांत सेवा देत आहेत. आजच्या घडीला राज्यात असे 350 ते 400 डॉक्टर प्राध्यापक आहेत. तर यातील 90 ते 100 डॉक्टर एकट्या मुंबईत आहेत, अशी माहिती एका आंदोलनकर्त्या प्राध्यापक डॉक्टरने दिली आहे. अस्थायी डॉक्टरांना सेवेत कायमस्वरूपी सामावून घेतले जाते. मात्र आज काही प्राध्यापक डॉक्टर पाच-पाच वर्षे अस्थायी पदावर काम करत आहेत.
'या' आहेत मागण्या -
या अस्थायी डॉक्टर प्राध्यापकांना कोणत्याही सेवासुविधांचा लाभ मिळत नाही. पदव्युत्तर शिक्षण घेऊन, पाच-पाच वर्षे शिक्षक म्हणून काम करत असतानाही आम्हाला निवासी डॉक्टरांइतकाच पगार मिळतो. पगारही कमी असून इतरही अडचणी आहेत. त्यामुळे आपल्याला कायमस्वरूपी सेवेत सामावून घेण्याची मागणी असल्याचे या डॉक्टरांनी सांगितले आहे. कोरोना काळात निवासी डॉक्टर, इंटर्न डॉक्टर, बंधपत्रित डॉक्टर असे सगळ्यांचे पगार वाढले. पण आमचे पगार वाढले नाहीत. त्यामुळे सातवा वेतन आयोग लागू करत पगारवाढ देण्याचीही आमची मागणी असल्याचेही या डॉक्टरांनी सांगितले आहे. या डॉक्टरांची कोणतीही संघटना नाही. पण या डॉक्टरांना महाराष्ट्र राज्य वैद्यकीय शिक्षक संघटना, महाराष्ट्र यांनी पाठिंबा दिला आहे.
...अन्यथा बेमुदत काम बंद आंदोलन
आपल्याला सेवेत कायमस्वरूपी सामावून घ्यावे, यासाठी कित्येक वर्ष सरकारकडे पाठपुरावा केला जात आहे. पण सरकार याकडे कायम दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे आता हे दोन दिवसीय आंदोलन पुकारण्यात आले आहे. येत्या काही दिवसांत मागण्या मान्य झाल्या नाही तर, बेमुदत कामबंद आंदोलन करण्याचा इशारा या डॉक्टरांनी दिला आहे.