मुंबई:महाराष्ट्रातील दिग्गजांच्या राजकीय लढाईत तरुणाईचा प्रवेश होत आहे. आता भारतीय जनता पक्षाने आदित्य ठाकरेंना प्रत्युत्तर देण्यासाठी युवा मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष तेजस्वी सूर्या यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेतल्याच्या चर्चा आहेत. आदित्य ठाकरे यांच्या वरळी विधानसभा मतदारसंघात भाजप युवा मोर्चाच्या कार्यालयाचे उद्घाटन तेजस्वी सुर्या यांच्या हस्ते करण्यात आल्याने या चर्चा सुरू झाल्या आहेत. या कार्यालयाच्या उद्घाटनानंतर त्यांनी एक सभा देखील घेतली. या सभेत बोलताना त्यांनी महाविकास आघाडीसह शिवसेना व उद्धव ठाकरे यांच्यावर बोचरी टीका केली आहे.
युवा वॉरियर शाखेचे उद्घाटनयावेळी बोलताना सूर्या म्हणाले की, मी आता सध्या मुंबई महानगराचा प्रवास करत आहे. युवा मोर्चाचा राष्ट्रीय अध्यक्ष असल्याने मी देशभरातील हजारो कार्यकर्त्यांसह बातचीत करतो. यातून एक मला समजलं की, देशात भाजपमध्ये मोठ्या संख्येने तरूण प्रवेश करत आहेत. मी आज मुंबईत येऊन वरळी विधानसभेत आज युवा वॉरियर शाखेचे उद्घाटन केले आहे. मला आशा आहे, हजारो तरुण या उपक्रमात जबाबदारीने काम करतील. तरुणांच्या सहभागाने व जबाबदारी घेतल्यावरच लोकशाही सक्षम होईल.
एक क्रांती घडताना दिसेलपुढे बोलताना भाजपचे सुर्या म्हणाले की, मुंबईच ५०० हून अधिक युवा वॉरियर शाखा कार्यरत आहेत. युवा वॉरियर या भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या उपक्रमामुळे एक क्रांती घडताना दिसेल. राजकारणात ज्यांची पार्श्वभूमी नाही. मात्र देशासाठी समर्पित भावनेने काम करण्याची इच्छा आहे. त्यांना या माध्यमातून व्यासपीठ मिळणार आहे. येत्या महापालिका, विधानसभा व लोकसभा निवडणुकांमध्ये युवा मोर्चा प्रभावीपणे काम करताना दिसेल. असे देखील भाजपच्या तेजस्वी सुर्या यांनी म्हटले आहे.
महाराष्ट्रवरचे ग्रहण दूरपुढे बोलताना ते म्हणाले की, येत्या २५ वर्षांत युवकांचे योगदान महत्त्वाचे असणार आहे. त्यांच्या कामाच्या आधारावर विश्वगुरू म्हणून भारत पुढे येईल. महाराष्ट्र व विशेषतः मुंबईचा देशाच्या विकासात मोलाचे योगदान असेल. युवकांचा सहभागाने एका नव्या मुंबईसह व नव्या महाराष्ट्राची नांदी असेल. गेल्या अडीच वर्षांत मुंबईसह राज्याला एक ग्रहण लागले होते. शिंदे व फडणवीस सरकारने हे ग्रहण दूर केले आहे.
थेट उद्धव ठाकरेंवर टीकाएका विधानसभेस अधिक महत्त्व देत आहात. प्रत्येक विधानसभा व वॉर्ड भाजपासाठी महत्त्वाचा आहे. विधानसभा किंवा वॉर्ड हा कुठल्याही एका व्यक्तीची किंवा कुटुंबाची जहागीरदार नसते. 2 ते 3 महिन्यांपूर्वी सत्तेत कोण होते ? अचानक बेरोजगारीचा मुद्दा कुठून आला ? सत्ता गेल्याने ही निराशा आली आहे. भ्रष्टाचार, सत्तेची लालसा आणि घराणेशाही हे महाराष्ट्राला लागलेले शाप. देशाला जिंकवण्याचे आमचे उद्दीष्ट आहे. कुणा एकाला हरवण्याचे उद्दिष्ट नाही. भारत जिंकणे हे महत्त्वाचे आहे. उद्धव ठाकरे यांची शिवसेना खरी नाही. ते शिवसेना नाही, ते आज वसुली सेना झाली आहे. खरी शिवसेना आज भाजप सोबत आहे, असे देखील सुर्या यांनी म्हटले आहे.