मुंबई :शिवसेना म्हटलं की डोळ्यांसमोर बाळासाहेब ठाकरे यांची प्रतिमा उभी राहते. राज्याच्या राजकारणात ठाकरे कुटुंबाला महत्त्व आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंपासून ठाकरे कुटुंबातील प्रत्येकजण राज्याच्या राजकारणात सक्रिय आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसह आमदार आदित्य ठाकरे यांनी राज्याचे मंत्रीपदही भूषावले आहे. मात्र, राजकारण बाजूला ठेवून ठाकरे घराण्यातील तेजस ठाकरे यांनी एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. तेजस ठाकरे यांनी सापाच्या नव्या प्रजातीचा नुकताच शोध लावला आहे.
सापावरील शोधनिबंध प्रसिद्ध :तेजस ठाकरे यांच्या टीमने पश्चिम घाटात संशोधन करताना नवीन सापाची प्रजाती शोधून काढली आहे. तसेच, सापडलेल्या या नवीन प्रजातीला 'सह्याद्रिओफिस' असे नाव देण्यात आले आहे. नॅशनल हिस्ट्री म्युझियम लंडन आणि जर्मनीतील मॅक्स प्लँक इन्स्टिट्यूटच्या आंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये या सापाच्या प्रजातीवरील शोधनिबंध प्रसिद्ध झाला आहे.
11 हून अधिक दुर्मीळ प्रजातीचा शोध : तेजस ठाकरे सातत्याने अनेक जंगलांना भेटी देऊन निसर्गातील जैवविविधतेत नाविन्य शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. याआधीही त्यांनी खेकडे, मासे, समुद्री ऑर्किड यांसारख्या 11 हून अधिक दुर्मीळ वन्य प्रजाती शोधून त्यांना नावे दिली आहेत. सिंधुदुर्गातील आंबोली येथील हिरण्यकेशी येथे सापडलेल्या आराध्य सुवर्ण 'देवाचा मासा'चे संवर्धन करण्यासाठी तेजस ठाकरे यांनीही संवर्धन मोहीम सुरू केली आहे. दरम्यान, तेजस ठाकरे आणि त्यांच्या टीमने पश्चिम घाटात सापाच्या आणखी एका नव्या प्रजातीचा शोध लावला आहे.