मुंबई -पश्चिम रेल्वे मार्गावरील विरार रेल्वे स्थानकादरम्यान रेल्वेच्या ओव्हर हेड वायरवरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे वसई-विरार दरम्यानची अप-डाऊन मार्गाची वाहतूक विस्कळीत झाली होती. यामुळे अनेक लोकल सेवाना लेटमार्क लागलेला आहे.
काही मिनिटात बिघाड दुरुस्त -
पश्चिम रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, आज सकाळी 11 वाजून 27 मिनिटांनी विरार रेल्वे स्थानकाच्या दरम्यान रेल्वेच्या ओव्हर हेड वायरमध्ये तांत्रिक बिघाड झालेला होता. या तांत्रिक बिघाडामुळे ओव्हर हेड वायरमधील विद्युत पुरवठा खंडित झाल्याने वसई-विरार दरम्यानची अप-डाऊन मार्गाची वाहतूक काही काळासाठी विस्कळीत झाली होती. मात्र, या घटनेची माहिती पश्चिम रेल्वे प्रशासनाला मिळताच पश्चिम रेल्वेचे अभियांत्रिक पथक घटनास्थळी दाखल होऊन हा बिघाड अवघ्या काही मिनिटात दुरुस्त करण्यात आला आहे. त्यानंतर 12 वाजून 22 मिनिटांनी उपनगरीय लोकल सेवा पूर्ववत धावू लागलेल्या आहेत.