मुंबई :महाविकास आघाडीची पहिली वज्रमूठ सभा छत्रपती संभाजीनगरात तर दुसरी सभा भाजपचा बालेकिल्ला असलेल्या नागपूरमध्ये पार पडली आहे. आता महाराष्ट्र दिनी १ मे रोजी महाविकास आघाडीची तिसरी 'वज्रमूठ' सभा मुंबईतील 'बीकेसी' मैदानात होत आहे. या सभेचा 'टीझर' प्रकाशित करण्यात आला आहे. अगोदरच्या २ सभांचा इतिहास पाहता या सभेकडे 'मविआ'च्या नेत्यांकडून विशेष लक्ष देण्यात आले आहे. कुठल्याही पद्धतीचा वाद महाविकास आघाडीत होऊ नये, यासाठी काळजी घेतली जात आहे.
विशेष रणनिती तयार : १ मे च्या मुंबईतील सभेच्या तयारीसाठी विशेष रणनिती आखण्यात आली आहे. याकरिता मुंबईच्या ग्रँड हयात हॉटेलमध्ये महाविकास आघाडीच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक पार पडली. 'मविआ'च्या पहिल्या सभेच्या 'टीझर'मध्ये राहुल गांधी यांना वगळण्यात आले होते. त्याचबरोबर नागपूरच्या दुसऱ्या सभेमध्ये अजित पवार यांनी भाषण न केल्याने बरेच प्रश्न सत्ताधाऱ्यांनी उपस्थित केले होते. या महत्त्वाच्या सभेकडे सत्ताधाऱ्यांचे लक्ष लागलेले असताना महाविकास आघाडीतील नेत्यांनी याबाबत अधिक दक्षता घेतली असून ही सभा ऐतिहासिक करण्याचा प्रयत्न केला जात आहे.