मुंबई -मुंबई महानगर प्रदेश (एमएमआर) परिसरातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना लोकल प्रवासासाठी मुभा नाही. त्यामुळे शिक्षकांना शाळेत पोहोचण्यासाठी अनेक अडचणी येत आहेत. या अडचणी लक्षात घेता आता शालेय शिक्षण विभागाने शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या 50 टक्के उपस्थितीची अट शिथिल केली आहे. त्यामुळे शिक्षकांना मोठा दिलासा मिळालेला आहे.
आता शिक्षकांना वर्क फ्रॉम होम -
शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना लोकल प्रवासास परवानगी मिळत नसल्याने त्यांचे प्रचंड हाल झाले. याकडे भाजपा शिक्षक आघाडीचे प्रदेश सहसंयोजक अनिल बोरनारे यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले होते. तसेच मुख्यमंत्री व शिक्षणमंत्र्यांकडे निवेदन देऊन प्रशासनाकडे पाठपुरावा केला होता. या पाठपुराव्यामुळे राज्याचे शिक्षण संचालक व मुंबई विभागाचे शिक्षण उपसंचालक यांनी शिक्षण निरीक्षक व शिक्षणाधिकाऱ्यांना आदेश दिले. त्यानुसार, ५० टक्के उपस्थितीची अट वगळली आहे. आता शिक्षकांना वर्क फ्रॉम होम करता येणार आहे. शिक्षकांना घरूनच ऑनलाईन शिक्षण देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
शिक्षकांवर आर्थिक भार -
विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी मुंबईतील शाळांमधील ठाणे, पालघर, नवी मुंबई व रायगड जिल्ह्यात निवास करणाऱ्या शिक्षकांनी खासगी गाड्यांनी प्रवास केला. ठाणे, पालघर व नवी मुंबईतील शाळांमध्ये अध्यापन करणाऱ्यांना लोकल प्रवासाशिवाय पर्याय नाही. त्यामुळे या जिल्ह्यांतर्गत काम करणारे शिक्षकही स्वः खर्चाने खासगी गाड्यांनी प्रवास करत आहेत. त्यासाठी मोठा आर्थिक भार शिक्षकांना पडत होता. त्यामुळे शिक्षकांना ऑनलाईन अध्यापनासाठी वर्क फ्रॉम होम करू देण्याची मागणी भाजपा शिक्षक आघाडीचे प्रदेश सहसंयोजक अनिल बोरनारे यांनी केली होती.