मुंबई - महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून फेब्रुवारी-मार्च महिन्यात घेण्यात आलेल्या दहावी-बारावी परीक्षांच्या उत्तरपत्रिका जमा करण्यासाठी मंडळाने शिक्षकांना खूप मोठा दिलासा दिला आहे. कोरोना आणि लॉकडाऊनच्या परिस्थितीमुळे शिक्षकांना दहावी-बारावीच्या उत्तरपत्रिका तपासून त्या विभागीय मंडळात जमा करणे कठीण झाले होते. त्यामुळे शिक्षण मंडळांने उत्तरपत्रिका जवळच्या परीक्षा केंद्रांमध्ये जमा करण्यासाठी सोय केली आहे. मंडळाच्या या निर्णयाचे महाराष्ट्र शिक्षण क्रांती संघटनेने स्वागत केले आहे.
मंडळाच्या या निर्णयामुळे आता लवकरात लवकर उत्तर पत्रिका जमा होण्याची शक्यता आहे. यामुळे परीक्षेचे निकाल जाहीर होण्यास मदत मिळणार आहे. राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर २२ मार्चपासून सर्व शाळा- महाविद्यालये बंद करण्यात आली होती. त्यापूर्वी बारावीची लेखी परीक्षा पूर्ण झाली होती. मात्र, दहावीचे दोन पेपर राहिले होते. त्यात एका पेपरची परीक्षा झाली आणि भूगोलाचा पेपर रद्द करण्यात आला. तेव्हापासून आत्तापर्यंत राज्यात लॉकडाऊन कायम असून ज्या शिक्षकांनी आत्तापर्यंत दहावी बारावीचे पेपर तपासले ते मंडळात जमा करण्यासाठी त्यांना अडचणींना सामोरे जावे लागत होते.